पावसाची उसंत : पिके पाण्याखाली, शेतकऱ्यांना चिंता
बेळगाव : मागील दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी अद्याप मार्कंडेय नदीची पाणीपातळी स्थिर आहे. शिवाय नदीकाठावरील पुराचा धोकादेखील कायम आहे. शनिवारपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र मार्कंडेय आणि बळ्ळारी काठावरील पूरपरिस्थिती जैसे थे आहे. जुलै मध्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. अपेक्षेपेक्षा अधिक पाऊस झाल्याने नदी, नाले आणि जलाशयाच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. राकसकोप जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात अधिक पाऊस झाल्याने जलाशय तुडुंब भरला आहे. शिवाय अतिरिक्त पाण्याचा विसर्ग मार्कंडेय नदीत करण्यात आला होता. त्यामुळे नदीकाठावरील हजारो एकर जमिनीतील पिके पाण्याखाली गेली आहेत. अद्याप पूर ओसरला नसल्याने पिकांना धोका निर्माण झाला आहे.
जुलै महिन्यात अतिरिक्त पाऊस झाला आहे. त्यामुळे नदी आणि जलाशयातही अतिरिक्त पाणी साठा झाला आहे. दरम्यान खबरदारी म्हणून जलाशयातील पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे नदी काठावरील पूरस्थिती कायम आहे. पाऊस गेल्यानंतरदेखील चार दिवसांनंतर पूर परिस्थिती जैसे थे आहे. पाऊस न झाल्यास पूर ओसरायला अद्याप आठवड्याचा कालावधी लागेल, असे वाटत आहे. यंदा समाधानकारक पावसामुळे जून महिन्यात पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले होते. मात्र जुलै महिन्याच्या पंधरवड्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांना धोका निर्माण झाला आहे. गतवर्षी कमी पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी जुलै महिन्यात नदी काठावरदेखील भात रोपांची लागवड केली होती. मात्र यंदा जुलै महिन्यात अति पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसला आहे.
शेतकऱ्यांचे लक्ष पूर ओसरण्याकडे
मागील आठ दहा दिवसांपासून मार्कंडेय नदी काठाच्या शिवारात पाणी साचून आहे. सद्यस्थिती पावसाने काहीशी उसंत घेतली असली तरी पूरपरिस्थिती जैसे थे आहे. त्यामुळे पूर कधी ओसरतोय याकडे नदीकाठावरील शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. शिवाय आठ दहा दिवसांपासून पिके पाण्याखालीच असल्याने कुजण्याची चिंता व्यक्त होत आहे.









