प्रतिनिधी/ पेडणे
गेले काही दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पेडणे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसाने शनिवारी सकाळी तिळारी धरण्याच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे धरणाचे पाणी आठ वाजून दहा मिनिटांनी सोडण्यात आले. त्यामुळे बैलपार नदीत पूरसदृश स्थिती निर्माण झाली. लाल पाण्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली तसेच पाणी जवळच्या बागायतीत घुसले.
सकाळी पाण्याचा प्रवाह जरा जास्त होता मात्र सायंकाळच्या वेळेस हा प्रवाह बराच कमी झाल्याची माहिती लोकांनी दिली. सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी तिळारी धरणाचे पाणी सोडण्यात आले होते. पाणी गोव्याच्या दिशेने आणि तिळारी परिसरातून आल्यानंतर पेडणे तालुक्यातील इब्रामपूर आणि बैलपार नदीला मिळाले मात्र यामुळे शेती बागायतीचे मोठ्या प्रमाणात तरी नुकसान झाले नाही. पुढील एक दोन दिवसात पाणी वाढण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणाही सज्ज असणे गरजेची आहे.
दरम्यान, पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी अलिकडेच तिळारी धरण प्रकल्पाला भेट देऊन तेथील अधिकाऱ्यांना तिळारी धरण भरल्यानंतर टप्प्याटप्प्याने पाणी सोडण्याची सूचना केली होती. त्यानुसार काही प्रमाणात सकाळी पाणी आले मात्र संपूर्ण दिवस पाण्याचा निचारा सुरू होता त्यामुळे त्याचा परिणाम शेतकऱ्यांना आणि स्थानिकांना जाणवला नाही.
मात्र सरकारी यंत्रणाही सज्ज ठेवावी, अशी मागणी यावेळी चांदेल हसापूरचे सरपंच तुळशीदास गावस यांनी केली आहे. त्यांनी चांदेल, हसापूर, वजरी, इब्रामपूर बैलपार या भागात जाऊन पाहणी केली.









