पावसाचा कहरच तिळारी धरणातून आजपासून पाणी विसर्ग,कोलवाळ, साळ, पिर्ण, धारगळ भागात अलर्ट
पणजी : पावसाची विक्रमी घोडदौड सुरूच असून गेल्या 24 तासांमध्ये 3.50 इंच सरासरी पाऊस पडलेला आहे. राज्यात आतापर्यंत 76 इंच पाऊस पडला असून आगामी 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. राज्यातील सर्वच नद्यांचा जलस्तर वाढलेला आहे. तिळारी धरणातील पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने आजपासून तिळारीचे दरवाजे खोलण्यास प्रारंभ होणार असल्याने कोलवाळ, साळ, पिर्ण, धारगळ इत्यादी भागात अलर्ट जारी केला आहे. गोव्यात पावसाचे थैमान चालूच असून गुऊवारी रात्री उशिरापर्यंत संपूर्ण गोव्यात पावसाची रिपरिप चालूच होती. शुक्रवारी संपूर्ण दिवसभर सर्वत्र जोरदार पाऊस झाला. परिणामी राज्यात पुराची भीती निर्माण झाली आहे. राज्यातील सर्वच नद्या दुथडी भऊन वाहत आहेत. सत्तरीतील सर्वच नद्या धोक्याच्या पातळीपर्यंत जाऊन पोहोचल्या आहेत. घाट माथ्यावर पावसाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे राज्यातील सर्व नद्यांमध्ये जलस्तर धोक्याच्या पातळीवर जाऊन पोहोचला आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील तीन दिवस गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
वार्षिक सरासरीपेक्षाही 13 इंच जादा पाऊस गोव्यात झालेला असून दिवसाकाठी सध्या सरासरी 3 इंच एवढी पावसाची विक्रमी नोंद गेल्या 15 दिवसांमध्ये झाली आहे. राज्यातील सर्वच धरणांमध्ये भरपूर पाणीसाठा निर्माण झाला आहे. साळावली धरण फुल्ल झालेले आहे. आता पुढील 4 दिवसांमध्ये अंजुणे धरण 91 मीटरचे आपले उद्दिष्ट पूर्ण करील. त्यानंतर या धरणाचे दरवाजे खोलले जातील. सध्या सांखळीच्या वाळवंटी नदीचा जलस्तर पाहता तिथे पूरसदृश स्थिती निर्माण झालेली आहे. पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही त्यामुळे डोंगरमाथ्यावर पावसाचे प्रमाण वाढले वा तसेच राहिले तर एक दोन दिवसांत गोव्यात अनेक ठिकाणी पूर येण्याची शक्यता आहे. सत्तरीमध्ये प्रशासनाने सतर्कता निर्माण केली आहे. म्हादई नदी सध्या दुथडी भऊन वाहतेय व काही भागात त्यामुळे पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे.
तिळारी भरले, आज गेट उघडणार
दरम्यान, वाढत्या पावसामुळे व धरण क्षेत्रात वाढलेली पाण्याची आवक लक्षात घेता तिळारीमधून आजपासून पाण्याचा विसर्ग सुरू केला जाणार आहे. तिळारीचे चार गेटस् आज हळूहळू खोलल्या जातील. त्यामुळे नद्यांची पातळी वाढण्याची शक्यता आहे. शापोरा नदीला पूर येईल. त्यामुळे सरकारने अलर्ट जारी केला आहे. साळ, पिर्ण, राण्याचे जुवें, कोलवाळ व धारगळ परिसरात नदीचे पाणी वाढून पूर येण्याची भीती आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन जनतेला सतर्क राहाण्यास सरकारने सांगितले आहे.
गेल्या 24 तासात पडलेला पाऊस (इंचामध्ये)
दरम्यान, गेल्या 24 तासात पावसाने गोव्याला झोडपून काढले. सर्वाधिक पाऊस केपे, सांगे, फोंडा, केपे व काणकोणमध्ये झाला. या तिन्ही ठिकाणी प्रत्येकी 4 इंच पावसाची नोंद झाली. तर इतर ठिकाणी पडलेला पाऊस पुढील प्रमाणे : म्हापसा – 2.50, पेडणे – 4.50, फोंडा – 4.50, पणजी – 3, सांखळी – 3, वाळपई – 4, दाबोळी – 2, मडगाव – 4, मुरगाव – 2, केपे व सांगे प्रत्येकी 4 इंच अशी विक्रमी नोंद झाली.









