आळसंद / संग्राम कदम :
मे महिना असूनही सध्या राज्यात अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातले आहे. खानापूर तालुक्यासह संपूर्ण भागात गेल्या आठ दिवसांपासून संततधार सुरु आहे. मे महिन्यात जसा पाऊस अपेक्षित नसतो, तसा पाऊस सध्या पडतो आहे. परिणामी, येरळा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. ही स्थिती पाहता पन्नास वर्षांपूर्वीची आठवण जागी झाली आहे.
रामापूर (ता. कडेगाव) येथील ६५ वर्षीय शेतकरी कॉ. शिवराम माळी यांनी तरुण भारत शी बोलताना आपल्या अनुभवाचे बोल सांगितले. ते म्हणाले, २५ मे ते २ जून १९७६ या कालावधीत अशीच परिस्थिती होती. त्या काळातही भर उन्हाळ्यात अचानक मोठा पाऊस झाला होता. त्यावेळी सुद्धा येरळा नदीला मोठा पूर आला होता, अगदी असाच पाऊस गेल्या आठवड्यात पडला आणि पन्नास वर्षांनी पुन्हा येरळा दुथडी वाहू लागली.
शिवराम माळी यांनी सांगितले की हे सगळे निसर्गाचं नव्हे तर मानवनिर्मित आहे. गेल्या काही दशकांमध्ये मानवाने मोठ्या प्रमाणावर जंगलतोड केली, नद्या-ओड्यांच्या काठांवर अतिक्रमण केले. पर्यावरणावर अनावश्यक ताण दिला. यामुळे पृथ्वीचं तापमान वाढत गेलं, हवामानात मोठे बदल घडू लागले. ऋतूचक्र बिघडले आणि अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती वाढू लागल्या.
गेल्या आठवड्यात आलेल्या मुसळधार पावसामुळे येरळा नदीसह परिसरातील ओढे, नाले, ओहोळ भरून वाहू लागले. पिकांचे नुकसान, शेतातील माती याहून जाणे, गावांमध्ये पाणी साचणे, अशा अनेक समस्यांना स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांना सामोरे जावे लागत आहे.
माळी म्हणाले, आधीच उन्हाळ्यामुळे जनावरांना चारा आणि पाणी मिळणं कठीण होतं, त्यात आता पावसामुळे अजूनच अडचणी वाढल्या आहेत.
या घडामोडींकडे फक्त एक अपघात म्हणून न पाहता, एक इशारा म्हणून पाहणं गरजेचं आहे. माळी यांनी सांगितले की, निसर्गाचा तोल बिघडवणं आपण थांबवलं पाहिजे. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढे यायला हवं. आज आपण जर जागरूक झालो नाही, तर उद्या निसर्गाचा कोप आणखी भयानक स्वरूप धारण करेल.
ही पावसाची स्थिती आपल्याला पुन्हा एकदा सांगून जाते की, निसर्ग हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्याच्या रक्षणासाठी आपण एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत, अन्यथा असे पूर, पर्जन्यवृष्टी, हवामान बदल हे अधिक भयावह रूप घेतील. त्यामुळे प्रत्येकाने पर्यावरणाचे रक्षण करून निसर्गाचा समतोल राखला पाहिजे. अन्यथा पर्यावरणाचा हास होऊन येणाऱ्या पिढ्यांना याचा त्रास सहन करावा लागेल.
- रामापूरच्या शिवराम माळींनी जागविल्या पावसाच्या आठवणी
येरळा दुथडी भरून वाहतेय.. आणि मला पुन्हा पन्नास वर्षांपूर्वीचा तोच दिवस आठवतोय, असं सांगताना रामापूरचे ६५ वर्षीय शिवराम माळी भावुक झाले. मे १९७६ मध्ये ते वयाच्या १६ व्या वर्षी शेतावर होते. उन्हाळ्याचा शेवटचा टप्पा चालू असतानाच अचानक आभाळ भरून आलं, आणि सलग आठ दिवस धुवांधार पाऊस झाला. येरळा नदी दुथडी भरून वाहू लागली. गावात मीतीचं वातावरण होतं. आम्ही तर त्या काळात हे सगळं निसर्गाचा राग समजून घेतलं. आणि मे २०२५ मध्ये पुन्हा अशीच परिस्थिती. पुन्हा सलग आठवडाभर संततधार, पुन्हा येरळेचा पूर. फरक इतकाच आता माळी अनुभवाने परिपक्क झालेत. आता त्यांना माहिती आहे की, हा निसर्गाचा राग नसून मानवी चुकीचं फलित आहे. त्या वेळी आम्ही काहीच करू शकलो नाही, पण आता तरी आपण निसर्गाशी जपून वागायला हवं. जंगलतोड, प्रदूषण, हवामान बदल हे सगळं थांबवणं गरजेचं आहे, असं ते अनुभवानं सांगतात.








