विकास आढावा बैठकीत महसूलमंत्री कृष्णभैरेगौडा यांच्या अधिकाऱ्यांना कानपिचक्या
बेळगाव : संभाव्य पुराचा सामना करण्यासाठी ग्राम पंचायत पातळीवर अस्तित्वात असलेल्या टास्क फोर्सनी जबाबदारीने काम केल्यास पुराच्या वेळी होणारी हानी टाळता येते, असे महसूलमंत्री कृष्णभैरेगौडा यांनी सांगितले. सोमवारी सुवर्ण विधानसौधमध्ये महसूल खात्याच्या विकास आढावा बैठकीच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. यंदा दरवर्षीपेक्षा अधिक पाऊस पडतो आहे. नद्यांचे अंतर्गत प्रवाह वाढले आहेत. संभाव्य पूर लक्षात घेऊन कोणत्या गावांना पुराचा फटका बसणार आहे, त्या गावातील नागरिक व जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी आवश्यक तयारी करावी. याकामी गरज भासल्यास पोलिसांचीही मदत घ्यावी. लोक अडचणीत असताना केवळ त्यांना भरपाई वितरित करून येणे इतकेच अधिकाऱ्यांचे काम नाही. संभाव्य आपत्तींविषयी नागरिकांना माहिती देऊन त्यांच्यामध्ये जागृती करून त्या टाळण्यासाठी काम करावेत, असे आवाहनही महसूलमंत्र्यांनी केले.
पीडीओसह सर्व कर्मचाऱ्यांनी कामाला लागावे
यासाठी ग्राम पंचायत पातळीवर पीडीओसह सर्व कर्मचाऱ्यांनी कामाला लागावे. जिल्ह्यात सर्व्हे पूर्ण झाला असून पुराचा फटका बसणाऱ्या गावांची यादी तयार करण्यात आली आहे. अशा गावांमध्ये जागृती करून येथील नागरिकांचे स्थलांतर करावे. शिथिल अवस्थेतील शाळा खोल्या, अंगणवाडी केंद्रे त्या इमारतीत भरवू नये, यासाठी खबरदारी घ्यावी. सुरक्षित इमारतीत त्यांची व्यवस्था करावी. पावसामुळे ज्यांच्या घरांची पडझड झाली आहे, त्यांना नियमानुसार भरपाई द्यावी. संभाव्य पुराच्या वेळी नागरिक व जनावरांच्या मदतीसाठी बोट तयार ठेवावी. तलाठी, महसूल निरीक्षक आदींनी आपल्या कार्यक्षेत्रातील शिथिल इमारतींची पाहणी करून या इमारतींच्या वापरावर बंदी घालावी. ओढे, नदी, नाल्यांजवळ नागरिक व जनावरांना जाण्यापासून रोखावे. ग्राम पंचायत व पोलीस दलाने समन्वयाने काम करून हानी टाळण्यासाठी प्रयत्न करावेत.
जिल्ह्यातील नव्या तालुक्यांना प्रजासौध उभारण्यासाठी मंजुरी
जिल्ह्यातील नव्या तालुक्यांना प्रजासौध उभारण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. शिथिल अवस्थेतील सरकारी कार्यालयांच्या दुरुस्तीसाठीही आवश्यक पावले उचलण्यात येणार आहेत. महसूल विभागाची सर्व कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत. सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होऊ नये, याची काळजी घेण्याची सूचनाही कृष्णभैरेगौडा यांनी अधिकाऱ्यांना केली. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी महाराष्ट्रात पाऊस वाढला आहे. त्यामुळे नद्यांचे पाणीही वाढले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क करण्यात येत आहे.
धोक्याची पातळी ओलांडणाऱ्या नदी, ओढे व पुलांवरून जाण्याचे धाडस करू नये, असे फलक लावण्यात आले आहेत. संभाव्य पुराचा सामना करण्यासाठी आवश्यक बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे, असे सांगितले. जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी पुराचा फटका बसणाऱ्या संभाव्य गावातील नुकसान टाळण्यासाठी ग्राम पंचायतींबरोबर बैठक घेऊन खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आल्याचे सांगितले. यावेळी विधान परिषद सदस्य नागराज यादव, महसूल खात्याचे आयुक्त पी. सुनीलकुमार, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी अभिनव जैन, अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पेन्शन पात्र लोकांनाच मिळावी
सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत मिळणारे पेन्शन पात्र लोकांनाच मिळावी. जिल्ह्यात अपात्रांनाही पेन्शन मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. यासंबंधी पाहणी करून अहवाल देण्याची सूचना कृष्णभैरेगौडा यांनी आपल्या अधिकाऱ्यांना केली. परवानगीशिवाय कृषीभूमीचा इतर कारणांसाठी वापर केला जात आहे. यावरही लक्ष ठेवावे. भूसुरक्षा योजनेंतर्गत महसूल विभागाच्या कागदपत्रांच्या डिजिटलीकरणाचा वेग वाढवावा. याकामी दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.









