भूस्खलनामुळे जनजीवन प्रभावित : मणिपूरमध्ये 883 घरांचे नुकसान : 7 राज्यांमध्ये 22 जणांचा मृत्यू
वृत्तसंस्था/ इंफाळ
ईशान्येतील राज्य मणिपूरमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. मागील 48 तासांमध्ये राज्यभरात अनेक ठिकाणी पूर आणि भूस्खलनामुळे 3802 लोक प्रभावित झाले असून 883 घरांचे नुकसान झाले आहे. राज्याची राजधानी इंफाळमधील अनेक भाग आणि पूर्व इंफाळ जिल्ह्यातील अनेक हिस्से जलमय झाले आहेत. अतिवृष्टीमुळे नद्यांची पातळी वाढली असून खुरई, हिगांग आणि चेकोन येथील बंधारे फुटले आहेत. ईशान्य भारतात आतापर्यंत अतिवृष्टीमुळे 22 जणांचा मृत्यू झाला आहे. आसाम, त्रिपुरा, मणिपूर, मिझोरम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशात पूरसंकट निर्माण झाले आहे.
मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी इंफाळच्या अनेक जलमग्न भागांचा दौरा केला, तर सैन्य आणि आसाम रायफल्सच्या जवानांनी सर्वाधिक प्रभावित पूर्व इंफाळमधील पूरग्रस्त भागांमधून सुमारे 8 हजार लोकांना वाचविले आहे. राज्यपालांनी मुख्य सचिव पी.के. सिंह आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत इंफाळमध्ये कांगला नोंगपोक थोंग, लॅरिक्येंगबाम लेइकाई आणि सिंगजामेई ब्रिजचा दौरा करत समग्र स्थितीची पाहणी केल्याचे राजभवनकडुन सांगण्यात आले.
प्राण्यांचा मृत्यू
शनिवारपर्यंत एकूण 3,275 भाग आणि गावं अतिवृष्टीमुळे प्रभावित झाली होती. तर पावसाशी संबंधित दुर्घटनांमध्ये अनेक जण जखमी झाले असून 64 गुरांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 12 ठिकाणी भूस्खलन झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले आहे. चेकोन क्षेत्रात इंफाळ नदीची पाणी पातळी वाढल्याने अनेक नागरी भागात पाणी शिरले आहे.
सिक्कीममध्ये अडकले पर्यटक
उत्तर सिक्कीममध्ये अतिवृष्टीनंतर भूस्खलन झाल्याने प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली. यामुळे सुमारे 1500 पर्यटक अडकून पडले आहेत. याचदरम्यान अतिवृष्टीनंतर 8 पर्यटक बेपत्ता झाले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. मंगन जिल्ह्यातील लाचेन-लाचुंग महामार्गवर मुन्सिथांगनजीक एक वाहन 1 हजार फुटांहून अधिक खोल दरीत कोसळल्याने हे पर्यटक बेपत्ता झाले होते. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत.









