आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू : बचावकार्य सुरू
वृत्तसंस्था/ नैरोबी
केनिया आणि सोमालियात अतिवृष्टी आणि अचानक आलेल्या पुरामुळे किमान 40 जणांचा मृत्यू झाला असून हजारो लोक विस्थापित झाले आहेत. सोमालियात 25 जणांचा बळी गेल्यावर आणि घरे, रस्ते अन् पूल वाहून गेल्यानंतर सरकारने आपत्कालीन स्थितीची घोषणा केली आहे. बचाव पथक आता दक्षिण सोमालियाच्या जुबालँड राज्यातील लूउक जिल्ह्यात पुराच्या वेढ्यात अडकून पडलेल्या हजारो लोकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.
तर संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्थानिक कार्यालयाने जुबा आणि शबेले नदीच्या काठांवर राहणाऱ्या लोकांना धोयाचा इशारा दिला आहे. जुबा येथे राहणाऱ्या लोकांना स्थलांतर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सोमालिया आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा जलदगतीने संकटाला सामोरी जात आहे. तर इथियोपियाच्या हायलँड्समध्ये अतिवृष्टी होत असल्याने आगामी काही दिवसांमध्ये पूरस्थिती आणखी भयावह होण्याची भीती आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचे व्यवस्थापकीय संचालक हसन इस्से यांनी व्यक्त केली आहे.
सलग 4 वर्षांपर्यंत दुष्काळाला तोंड देणाऱ्या सोमालियात अतिवृष्टीने आता पुराचे संकट निर्माण केले आहे. शेजारच्या केनियामध्ये देखील अतिवृष्ठी होत असल्याने मोम्बासा अन् मंडेरा तसेच वजीर या शहरांना मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे केनियातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर कुठल्याही विध्वंसक अल नीनो पूर येणार नसल्याचा दावा केनियाचे राष्ट्रपती विलियम रुटो यांनी केला आहे.









