बळ्ळारी नाल्याशेजारील शिवार पाण्याखाली : शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी
बेळगाव : संततधार पावसामुळे बळ्ळारी नाल्याला पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नाल्याचे पाणी शेतीमध्ये पसरून हजारो हेक्टर शेती पुराच्या पाण्याखाली आहे. केवळ शेतीच नाही तर रविवारी झालेल्या पावसामुळे वडगाव उपनगरालाही पुराचा धोका निर्माण झाला आहे. आनंदनगर, केशवनगर, अन्नपूर्णेश्वरीनगर येथील सखल घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले असून नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. मागील आठवडाभरापासून बेळगावसह परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. शनिवारी काहीशी उसंत घेतलेल्या पावसाने रविवारी मात्र सकाळपासून जोरदार बॅटिंग केली. दिवसभर पावसाचा जोर वाढत गेल्याने सखल भागामध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली. बळ्ळारी नाल्याला आलेल्या पुरामुळे आसपासच्या शेतीला मोठा फटका बसला. बळ्ळारी नाल्याचे पाणी वडगाव, शहापूर, जुने बेळगाव शिवारांमध्ये पसरले आहे. यामुळे भातपिकाचे मोठे नुकसान झाले.
प्रशासनाचा भोंगळ कारभार
वडगावमधील आनंदनगरपासून बळ्ळारी नाल्यापयर्तिं रस्त्याच्या एका बाजूने मोठा नाला तर दुसऱ्या बाजूने गटार बांधण्याचे काम हाती घेण्यात आले होते. परंतु, कासवगतीने सुरू असणाऱ्या या कामाचा सर्वसामान्यांना फटका बसला. नाला बांधकामासाठी काही ठिकाणी गटारीचे पाणी थांबविण्यात आले आहे. यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहात जात रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या शेतीमध्ये शिरले. पावसाचा जोर वाढल्याने वाहणाऱ्या पाण्याचाही जोर वाढून शेतीचे मोठे नुकसान झाले.
सखल भागात शिरले पाणी
बळ्ळारी नाल्याजवळच असणाऱ्या केशवनगर, अन्नपूर्णेश्वरीनगर, आनंदनगर, बाळकृष्णनगर या परिसरातील सखल भागात असणाऱ्या घरांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली. ज्या घरांमध्ये पाणी शिरले, तेथील साहित्य बाहेर काढेपयर्तिं नागरिकांची धावपळ उडाली. बळ्ळारी नाल्याच्या बांधकामाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे पुराचा फटका परिसरातील नागरिकांनाही बसत आहे. पिण्याच्या पाण्याच्या विहिरींमध्येही गटारीचे सांडपाणी शिरल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न वडगाव परिसरात निर्माण झाला आहे.
बळ्ळारी नाल्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवा
बळ्ळारी नाल्यामुळे आसपासच्या शेतकऱ्यांना दरवर्षी पुराचा फटका बसत आहे. हातातोंडाशी आलेल्या भाताच्या पिकाचे नुकसान होत आहे. पुढील आठवडाभर तरी पुराचे पाणी ओसरणार नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे बळ्ळारी नाल्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवावा, अशी मागणी केली जात आहे.









