स्टार एअरलाईन्स, इंडिगोच्या अधिकाऱ्यांचे आश्वासन : सांबरा विमानतळ विकासासंदर्भात खासदार जगदीश शेट्टर यांच्या उपस्थितीत बैठक
बेळगाव : येत्या काही दिवसांत पुणे शहरासाठी बेळगावातून विमानसेवा सुरू करण्यात येईल असे आश्वासन स्टार एअरलाईन्स व इंडिगोच्या अधिकाऱ्यांनी देले. बेळगाव (सांबरा) विमानतळ विकासासंदर्भात खासदार जगदीश शेट्टर यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या उपस्थित महसूल खाते, भारतीय वायुसेना, विमानतळ प्राधिकारण, इंडिगो व स्टारएअरलाईन्स यांची संयुक्त बैठक सांबरा विमानतळावरील कार्यालयात गुरुवारी घेतली. बेळगाव शहराचा विस्तार झपाट्याने होत असून देशातील विविध शहरांसाठी विमानसेवा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांकडून होत असल्याचे खासदार शेट्टर म्हणाले. यावर इंडिगो व स्टारएअरलाईन्स संस्थेच्या अधिकाऱ्यांनी पुणे शहरासाठी विमानसेवा उपलब्ध करून देऊ. त्यानंतर जोधपूर, अजमेर, चेन्नई मार्गावरही सेवा उपलब्ध करून देण्याचे सांगितले.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले की, बेळगाव विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा मिळवून देण्याच्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येतील. विमानतळाकडे येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी व वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी बेळगाव-सांबरा रस्त्याचे चौपदरीकरण करण्याचा विचारही बैठकीतून व्यक्त झाला. बैठकीला साहाय्यक आयुक्त श्रवण, विमानतळ प्राधिकरणचे संचालक त्यागराजन, इंडिगो व स्टार एअरलाईन्सचे अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर खासदार शेट्टर यांनी विमानतळ विस्तारीकरणासाठी सुरू असलेल्या टर्मिल इमारतीची पाहणी केली. 2026 पर्यंत काम पूर्ण होईल. त्यानंतर देशातील विविध शहरांना जादा विमानसेवा उपलब्ध होतील,असे खासदार शेट्टर यांनी सांगितले.









