आतील सर्व सामान जळून खाक, म्हापसा अग्निशामक दलामुळे अनर्थ टळला
म्हापसा : आराडी गिरी येथे बुधवारी सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान दामोदर रेसिडन्सीमध्ये तळमजल्यावर राहणाऱ्या राजेंद्र माशेलकर यांच्या फ्लॅटला आग लागून संपूर्ण फ्लॅट आगीत खाक झाला. घटनेची माहिती मिळताच म्हापसा अग्निशामक दलाने त्वरित घटनास्थळी धाव घेत आग विझविली. फ्रिजवर ठेवलेल्या ओवनमधील शॉर्टसर्किटमुळे आगीने पेट घेतला. हळूहळू आग भडकल्याने फ्लॅटमधून धूर बाहेर येऊ लागला. यावेळी घरात झोपलेल्या माशेलकर कुटूंब आरडाओरड करीत बाहेर आले. आजूबाजूच्या लोकांना बोलावून घेत पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न झाला मात्र तोपर्यंत आगीने सर्वत्र पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच म्हापसा अग्निशामक दलाचे अधिकारी क्रिष्णा पर्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिकारी ज्ञानेश्वर सावंत व इतरांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सर्वप्रथम घरात तीन स्वयंपाक गॅस बाहेर काढले व त्यानंतर आग विझवण्यास सुऊवात केली. स्थानिक पंच दालीनी फ्रँको म्हणाल्या की, आपण मुलांना शाळेत घेऊन जात असताना माशेलकर यांच्या फ्लॅटमधून धूर येत असल्याचा निदर्शनास आला. आपणच घटनेची माहिती म्हापसा अग्निशमन दलास दिल्यावर त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन आग विझविली. म्हापसा अग्निशामक दलाचे अधिकारी क्रिष्णा पर्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिकारी ज्ञानेश्वर सावंत, जवान स्वप्नेश कळंगुटकर, वासुदेव ताटे, गिरीश सावंत, संजय फडते, विष्णू केसरकर, प्रवीण पिसुर्लेकर यांनी ही आग विझविली.









