खेड :
शहरातील खांबतळ्याजवळील इमारतीतील फ्लॅट बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. मध्यवर्ती ठिकाणच्या गजबजलेल्या इमारतीत झालेल्या घरफोडीने एकच खळबळ उडाली आहे. चोरट्यांच्या शोधार्थ रविवारी श्वान पथकासही पाचारण करण्यात आले. अज्ञात चोरट्यांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील चिकन व्यावसायिक अल्ताफ मुकादम यांच्या मालकीचा फ्लॅट आहे. ते २ मे रोजी कुटुंबीयांसमवेत बाहेर गेले होते. शनिवारी रात्री येथे परतल्यानंतर फ्लॅटचा दरवाजा तोडून कपाटातील साहित्य चोरल्याचे निदर्शनास येताच धक्काच बसला. सोन्याच्या अंगठ्यांसह ४० ते ५० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे.
त्यांची पत्नी अजूनही परगावीच आहे. त्यामुळे त्या येथे परतल्यानंतरच सोन्याचे दागिने नेमके किती चोरीस गेले, याचा उलगडा होणार आहे.
येथील पोलीस निरीक्षक नितीन भोयर हे राहत असलेल्या फ्लॅटलगतच अल्ताफ मुकादम यांचा फ्लॅट आहे. मात्र, तरीही चोरट्यांनी मुकादम यांच्या फ्लॅटवर डल्ला मारण्याचे मोठे धाडस केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. घरफोडीची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भोयर यांनी चाचणीने घटनास्थळीची पाहणी करून श्वान पथकास पाचारण करण्याबाबत वरिष्ठांना सूचित केले.
त्यानुसार श्वानपथकही येथे दाखल झाले. या घटनेनंतर पोलिसांनी नाकाबंदी केली. पोलिसांकडून साऱ्या साऱ्या शक्यता पडताळल्या जात आहेत. लवकरच चोरट्यांच्या मुसक्या आवडण्यात यश येईल, असा विश्वास आहे येथील पोलिसांनी व्यक्त केला आहे.








