जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांची माहिती : इच्छुकांना सहभागी होण्याचे आवाहन
बेळगाव : जिल्ह्यात रोहयो अंतर्गत 93 अमृत सरोवर तलाव निर्माण करण्यात आले आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सदर तलाव काठांवर ‘एक तलाव, जलसंधारणाचा एक संकल्प’ या संकल्पनेखाली ध्वजारोहण करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पंचायत मुख्य कार्यनिर्वाहक अधिकारी राहुल शिंदे यांनी दिली. ते पुढे म्हणाले, स्वातंत्र्यदिनानिमित्त तलाव काठांवर ध्वजारोहणासोबतच तिरंगा यात्रा, वनीकरण, अमृत सरोवराचे महत्त्व सांगणारी पारंपरिक पदयात्रा, तलावात सेल्फी, ड्रोन व लाईटिंग शो, निबंध स्पर्धा, कविता स्पर्धा, पर्यावरण संरक्षणावरील नाटक, पर्यावरणपूरक कला स्पर्धा, स्वच्छता मोहीम, चित्रकला स्पर्धा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये इच्छुकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे त्यांनी सांगितले.
अमृत सरोवर म्हणजे काय?
आपले पूर्वज तलाव बांधून तेथील पाण्याचा योग्यरित्या वापर करायचे. मात्र सध्या पाण्याचा अपव्यय वाढला असून, अनेक ठिकाणी पाणी टंचाईची झळ नागरिकांना बसत आहे. अलिकडच्या काळात तलाव गायब होत आहेत. मात्र सरकारकडून याची दखल घेऊन अमृत सरोवर योजनेंतर्गत भूजल पातळी वाढविण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत तलावातील गाळ काढणे, कालव्यांचा विकास, तलाव काठांचा विकास, तलावांभोवती पर्यावरण संरक्षण आदी उपाययोजना हाती घेतल्या आहेत. जलस्रोतांचे पुर्नरुजीवन करण्यासाठी रोहयो अंतर्गत अमृत सरोवर तलावांची कामे करण्यात येत आहेत, असे त्यांनी सांगितले.









