मालिकेतील अन्य कलाकारांचाही सहभाग
न्हावेली / वार्ताहर
सन मराठी वाहिनीवरील क्षेत्रपाल श्रीदेव वेतोबा मालिकेतील वेतोबाची भूमिका साकारणारे कलाकार उमाकांत पाटील यांच्या विशेष उपस्थितीत मळगाव ग्रामपंचायतच्या पटांगणात स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण संपन्न झाले. या मालिकेतील अन्य कलाकारांनीही यावेळी विशेष उपस्थिती दर्शविली होती. मळगाव सरपंच स्नेहल जामदार व उपसरपंच हनुमंत पेडणेकर माजी सभापती राजेंद्र परब यांनी त्यांचे स्वागत करीत आभार मानले.
कोकणातील परंपरा प्रथा रुढीशिवाय तेथील गूढ गोष्टींविषयी कायमच महाराष्ट्राला एक प्रकारचे आकर्षण वाटत आले आहे. त्यापैकी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘ वेतोबा भक्तांचा रक्षणकर्ता , कोकणचा क्षेत्रपाल संकट निवारक आणि सिंधुदुर्गातील आरवली गावाचे ग्रामदैवत म्हणजे ‘ श्रीदेव वेतोबा ‘ कोकणात संकटसमयी भक्तांच्या हाकेला देवासारख्या धाऊन जाणाऱ्या वेतोबाला देवाचे स्थान आहे. संकटसमयी वेगवेगळ्या रुपांत हाकेला धावून येणाऱ्या वेतोबाची प्रचिती कित्येक गावकऱ्यांना आलेली आहे याचं वेतोबाच्या भक्तांना आलेल्या अनुभवावर आधारित क्षेत्रपाल श्रीदेव वेतोबा ही कोकणातील अध्यात्मिक परंपरेचे जतन करणारी मालिका सद्यस्थितीत घराघरात लोकप्रिय होत आहे विशेष म्हणजे या मालिकेतील श्रीदेव वेतोबाची भूमिका साकारणारे कलावंत उमाकांत पाटील यांची तर रसिक मनावर भुरळ पडली.
यावेळी रोहित शेट्टी, दिग्दर्शित सर्कस, सूर्यवंशी, सिंबा, संजय लिला भंसाळी दिग्दर्शित गंगुबाई काठीयावाडी’ इत्यादी हिंदी तसेच तामिळ सिनेमा काला आणि एक्सट्रॅक्शन या हॅालिवूडपटात अभिनय करुन प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता उमाकांत पाटील वेतोबाची भूमिका साकारत आहे. हाच अभिनेता उमाकांत पाटील श्रीदेव वेतोबाची भूमिका साकारत असल्याने याचे सदियस्थितीत सानथोर सर्वांनाच विशेष आकर्षण आहे. त्यामुळे मळगाव ग्रामपंचायतच्या ध्वजारोहण सोहळ्यात उमाकांत पाटील स्वत : उपस्थित राहिल्याने हा सोहळा अधिकच दिमाखात झाला. विशेष म्हणजे भस्मे या पात्राच्या गेटअपमध्येच उमाकांत पाटील उपस्थित राहिल्याने शाळकरी विद्यार्थ्यांनाही विशेष कौतुक वाटले. यावेळी त्याची स्वाक्षरी घेण्यासाठी मुलांनी गर्दी केली होती .









