भाजप जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांची केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडे मागणी
बेळगाव : बेळगाव-बेंगळूर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यासंबंधी रेल्वे विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. परंतु, अद्याप तारीख निश्चित झाली नसल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याची तारीख लवकर जाहीर करावी व बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग-सौंदत्ती तालुक्यांना रेल्वे रस्त्याद्वारे जोडावे, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. दिल्ली येथे बुधवारी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांची भेट घेऊन बेळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रश्नाबाबत त्यांनी चर्चा केली. हुबळी-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला बेळगावच्या प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद दिला जात आहे. त्यामुळे आता बेळगाव-बेंगळूर वंदे भारतची प्रतीक्षा आहे. या मार्गावरील सर्व ट्रेन दररोज फुल होत असल्याचे दिसून येत असल्याने वंदे भारत लवकर सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली. सौंदत्ती व रामदुर्ग तालुक्याला रेल्वे रस्त्याने जोडल्यास या दोन्ही तालुक्यांचा विकास झपाट्याने होईल, असेही त्यांनी सांगितले. मंत्री व्ही. सोमण्णा यांनी आपण यासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करू, असे आश्वासन दिले.









