15 लाखांचा ऐवज हस्तगत : बेळगाव ग्रामीण पोलिसांची कारवाई
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये घरफोड्या करणाऱ्या पाच जणांच्या एका टोळीला बेळगाव ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याजवळून 15 लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी बुधवारी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. कार्तिक ऊर्फ प्रशांत वसंत बाळेकुंद्री (वय 20), प्रसाद अशोक लाड (वय 21), विनित सहदेव बाळेकुंद्री (वय 22), सौरभ बसवंत रेमाण्णाचे (वय 20) चौघेही राहणार बसवाण गल्ली, धामणे एस., सलमान खुतबुद्दीन किल्लेदार (वय 24) राहणार मकानदार गल्ली, धामणे एस. अशी त्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. या तरुणांनी अवचारहट्टी, नंदिहळ्ळी, धामणे व बस्तवाड परिसरात बंद घरांचे कडीकोयंडा तोडून चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे. बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक नागनगौडा कट्टीमनीगौडर, उपनिरीक्षक लक्काप्पा जोडट्टी, उपनिरीक्षक आदित्य राजन, एस. बी. उप्पार, एम. एम. नाईक, एस. एस. हंचिनमनी, बी. एस. पडनाड, आनंद कोटगी, एस. व्ही. नाईकवाड, एम. बी. कोटबागी, शिवशंकर कांबळे, अमित रुपनावर व तांत्रिक विभागाचे रमेश अक्की, महादेव काशिद यांनी ही कारवाई केली आहे.
धामणे रोडवर नंबरप्लेट नसलेल्या एका स्प्लेंडर मोटारसायकलवरून दोघेजण व आणखी एका मोटारसायकलवरून तिघेजण येत होते. पोलिसांनी संशयाने त्यांना अडवून त्यांची चौकशी केली असता वेगवेगळ्या गावातील बंद घरांचा कडीकोयंडा तोडून चोऱ्या केल्याची कबुली त्यांनी दिली. एका बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात 3 व हिरेबागेवाडी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात 1 अशा चार चोऱ्यांचा उलगडा झाला आहे. लोखंडी रॉडने कडीकोयंडा तोडून ते चोरी करीत होते. त्यांच्याजवळून केए 22 ईएच 8538 क्रमांकाची हिरो होंडा सीडी डिलक्स व नंबरप्लेट नसलेली एक मोटारसायकल, चोरीसाठी वापरण्यात आलेली अवजारे, 130 ग्रॅम सोन्याचे दागिने, 310 ग्रॅम चांदीचे दागिने व सुमारे 25 हजार रुपये किमतीचे प्लंबिंगचे साहित्य असा एकूण 14 लाख 95 हजार 570 रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.









