ऑनलाईन टीम / तरुण भारत :
वंदे भारत एक्स्प्रेसवर आतापर्यंत 9 वेळा दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. या घटनांना रोखण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेने दगडफेकीसारख्या समाजविरोधी घटनांमध्ये सहभागी होणाऱ्यांना इशारा दिला आहे. अशा प्रकारचे कृत्य केल्यास 5 वर्षापर्यंत तुरूंगवास होऊ शकते, असे मध्य रेल्वेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.
मध्य रेल्वेने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, फेब्रुवारी 2019 मध्ये वंदे भारत एक्स्प्रेस सेवेत आल्यापासून तेलंगणा, बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमध्ये तिला टार्गेट केलं जात आहे. जानेवारी महिन्यापासून या एक्स्प्रेसवर दगडफेकीच्या 9 घटना घडल्या आहेत. रेल्वे सुरक्षा दलाने याप्रकरणी अनेक गुन्हे दाखल केले असून, 39 जणांना अटक करण्यात आली आहे. दगडफेकीच्या घटना कमी करण्याच्या हेतूने रेल्वे सुरक्षा दल प्रयत्न करत असून, यासाठी काही मोहीमाही आखण्यात आल्या आहेत.
ट्रेनवर दगडफेक करणे हा फौजदारी गुन्हा आहे. रेल्वे कायद्याच्या कलम 153 नुसार दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. ही शिक्षा 5 वर्षांपर्यंत असू शकते, असे दक्षिण मध्य रेल्वेने प्रसिद्धीपत्रकात सांगितले आहे.









