कराड :
रविवारच्या मध्यरात्री कराडजवळ महामार्गालगत वेगवेगळ्या ठिकाणी पाच अवजड वाहने बंद पडली. तांत्रिक बिघाडाने वाहने बंद पडल्याने वाहतूक कोंडी झाली अन् रात्रीच्यावेळी बंद पडलेली वाहने बाजूला करताना पोलिसांची मात्र पुरती दमछाक झाली. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने बंद पडलेली बाहने ढकलून बाजूला करण्यासाठी सलग चार तास घालवले. काळ वेळ न पाहता वाहने बाजूला करण्यासाठी धडपडणाऱ्या वाहतूक पोलिसांसाठी रविवारची रात्र कर्तव्याची कसोटी पाहणी ठरली.
कराड, मलकापूरलगत बर्दळीच्या ठिकाणी नव्या उड्डाणपुलाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. साहजिकच सेवारस्त्यावरून अडीच वर्षापासून महामार्गाची आणि स्थानिक वाहतूक सुरू आहे. एक चारचाकी वाहन अवघ्या पाच मिनिटांसाठी थांबले तरी पाठीमागे वाहनांची रांग लागते इतकी गंभीर परिस्थिती आहे.
- पोलिसांच्या कर्तव्याची कसोटी
खोळंबलेल्या वाहतुकीला सुरळीत करण्याच्या प्रयत्नात पोलिसांची चांगलीच कसोटी लागली. क्रेन मिळत नसल्याचे लक्षात येताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सूर्यवंशी यांनी पोलीस कर्मचारी सुधीर जाधव, शरद चव्हाण यांच्या माध्यमातून पोलीसमित्र नागरिकांशी संपर्क साधला. पोलीस मित्र नागरिकांच्या मदतीने ४० टनाहून जास्त वजनाचा ढेबेवाडी फाट्यावर बंद पडलेला कंटेनर ढकलून कसाबसा बाजूला केला. तो बाजुला करण्यात पोलिसांचा पाऊणतास गेला. यानंतर डी. मार्टपासून काही अंतरावरील बंद पडलेल्या बाहनास बाजूला करण्याचा प्रयत्न सुरू झाला. तो सुद्धा ढकलून बाजूला करण्यासाठी पोलीस धडपडत होते. तो बाजूला केला की पुन्हा हॉटेल ग्रीनलॅण्ड परिसरात रस्त्यावरच बंद पडलेली वाहने बाजूला करण्यास पोलीस धावले. बाहतूक कोंडीतून बाट काढत प्रसंगी दुचाकीवरून पोलीस तिथे पोहोचले. तिथे दोन बाहने बंद पडली होती. ती बाजूला करण्यासाठी पोलिसांना सुमारे दीड तास गेला.
रात्रीच्या अंधारात पोलिसांनी बजावलेले कर्तव्य पाहून वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले. बाहतूक पोलिसांच्या या कृतीचे पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी कौतूक केले.
- रविवारी रात्रीत पाच वाहने पडली बंद
रविवारी रात्री ११ नंतर मलकापूरच्या ढेबेवाडी फाटा, हॉटेल ग्रीनलॅण्ड, डी. मार्टपासून काही अंतरावर अशी पाच अवजड वाहने एकापाठोपाठ एक बंद पडली. रविवारच्या रात्री हायवेला बाहनांची वर्दळ इतर दिवसांच्या तुलनेत जास्त असते. त्यामुळे बंद पडलेल्या वाहनांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली. वाहतूक शाखेचे संदीप सूर्यवंशी यांना याची माहिती मिळताच त्यांनी समवेत रात्रगस्तीवर असलेल्या वाहतूक पोलीस सुधीर जाधव, शरद चव्हाण यांना वाहने बंद पडलेल्या ठिकाणी पोहोचण्याची सूचना करत ते स्वतः तिथे पोहोचले. रात्रीची वेळ असल्याने तांत्रिक कारणाने बंद पडलेली अवजड वाहने बाजूला करण्यासाठी क्रेन मिळणे अवघड बनले. रस्त्यावर अंधार, वाहतूक खोळंबलेली आणि अस्वस्थ नागरिक अशी परिस्थिती होती.








