वृत्तसंस्था /नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मंगळवारी 5 नव्या ‘वंदे भारत’ एक्स्पे्रस गाड्यांचा प्रारंभ केला जाणार आहे. या गाड्यांपैकी एक गाडी गोव्यातील मडगाव ते मुंबई अशी धावणार आहे. या मध्यम द्रुतगती वेगाच्या गाड्या असून त्यांचा वेग साधारणत: ताशी 200 किलोमीटर इतका निर्धारित करण्यात आला आहे. कर्नाटकात बेंगळूर ते धारवाड अशा वंदे भारत गाडीलाही हिरवा कंदील दाखविण्यात येणार असून ही गाडी हे अंतर 6 तास 35 मिनिटांमध्ये पार करणार आहे. मध्यप्रदेशला एक गाडी देण्यात आली असून ती इंदूर जंक्शन ते भोपाळ अशी धावणार आहे. हे अंतर कापण्यासाठी तिला तीन तास 5 मिनिटांचा वेळ लागणार आहे. चौथी गाडी मध्यप्रदेशात जबलपूर ते राणी कमलापती स्थानक अशी धावणार असून हा प्रवास ती 4 तास 35 मिनिटांमध्ये करणार आहे. पाचवी गाडी पाटणा ते रांची अशी धावणार असून यासाठी तिला सहा तासांचा वेळ लागणार आहे, अशी माहिती रेल्वे विभागाने दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गाड्यांचे उद्घाटन ऑनलाईनपद्धतीने मंगळवारी करणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.









