खानापूर बस आगारातील घटना : तीन हजारही लंपास, पर्स हिसकावून चोरट्याचे पलायन
प्रतिनिधी / खानापूर
येथील बस आगारात बसमध्ये चढताना एका महिलेची पर्स हिसकावून घेऊन चोरट्याने पलायन केले आहे. त्या पर्समध्ये महिलेचे पाच तोळ्dयाचे सोन्याचे दागिने आणि रोख तीन हजार रुपये रोख रक्कम होती. याबाबत खानापूर पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा नोंद केला आहे.
सन्नहोसूर येथील रहिवासी असलेले इराप्पा पाटील हे व्यवसायानिमित्त पुण्याला स्थायिक आहेत. त्यांच्या पत्नी सविता इराप्पा पाटील या सन्नहोसूर येथील महालक्ष्मी यात्रेसाठी आल्या होत्या. यात्रा संपवून त्या परत पुण्याला जाण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी 6.30 वाजता खानापूर बस आगारात बेळगाव बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने त्यांची पर्स लाबंवली आहे. पर्समध्ये सविता पाटील यांचे पाच तोळ्dयाचे सोन्याचे दागिने आणि रोख तीन हजार रुपये, कागदपत्रे, कपाटांच्या चाव्या होत्या. आपली पर्स चोरी गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरडा केला. वाहकाने बसमधील सर्वांची तपासणी केली. मात्र चोरट्याने पलायन केल्याने सापडू शकला नाही.
याबाबत खानापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. गेल्या दोन दिवसांत दागिने लंपास करण्याची ही दुसरी घटना आहे. हाजगोळी येथील महिला गुंजी येथे लग्नासाठी जात असताना खानापूर-रामनगर बसमध्ये महिलेचे दागिने याच पद्धतीने चोरी करण्यात आले होते. खानापूर शहरात बसस्थानक परिसरात गेल्या वर्षभरात चोरटे सक्रिय झाले आहेत. मात्र पोलिसांचा वचक आणि भीती नसल्याने चोरटे बिनधास्त वावरत आहेत. बसस्थानक तसेच शहरात आणि जुन्या बसस्थानक परिसरात दागिने चोरण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. पोलीस स्थानकात फिर्याद नोंदवण्यासाठी गेल्यास नोंदवून घेण्यात येत नाही. त्यामुळे अनेकांनी दागिने चोरी होऊनसुद्धा खानापूर स्थानकात गुन्हा नोंद केलेला नाही.
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी देवलत्ती आणि खानापूर येथील रेणुका ज्वेलर्स यांच्या दुकानातील दागिने चोरल्याची घटना ताजी आहे. यापूर्वी ग्रामीण भागातील घरे फोडून चोरी मोठ्या प्रमाणात होत्या. मात्र चोरट्यांनी आपला मोर्चा आता खानापूर शहरात आणि परिसरात वळवला असून दिवसाढवळ्या चोरीच्या घटना होत आहेत. आतापर्यंत एकाही चोरीचा तपास लावण्यात खानापूर पोलिसांना यश आलेले नाही. बसस्थानकात कायम पोलीस तैनात करण्यात यावा, अशी मागणी होऊन देखील या मागणीकडे साफ दुर्लक्ष केले आहे. खानापूर पोलिसांनी चोऱ्या रोखण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.
सीसीटीव्ही बसविण्याची मागणी
बसस्थानक आवारात आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने चोरट्यांचे आयते फावले आहे. यासाठी पोलीस प्रशासनाने आणि केएसआरटीसीने बसस्थानक आगार परिसरात योग्य जागी सीसीटीव्ही बसवण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.









