वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये गेल्या 24 तासात पाचवेळा भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 2.5 ते 4.5 रिश्टर स्केलवर इतकी नोंद झाली होती. शनिवारी, 17 जून रोजी दुपारी 2:30 वाजता पहिला भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता 3.0 रिश्टर स्केल होती. त्यानंतर लेहमध्ये शनिवारी रात्री 9.44 वाजता जाणवलेल्या धक्क्याची तीव्रता 4.5 रिश्टर स्केल होती. तिसरा भूकंपाचा धक्का जम्मू-काश्मीरमधील डोडा येथे भारत-चीन सीमेजवळ रात्री 9.55 वाजता झाला. याची तीव्रताही जवळपास 4.4 रिश्टर स्केल इतकी होती. रविवारी पहाटे 2.13 वाजता ईशान्य लेहमध्ये 4.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा चौथा भूकंपाचा हादरा बसला. यानंतर पहाटे 3.50 वाजता जम्मू-काश्मीरमधील कटरा येथे पाचवा भूकंपाचा धक्का बसला. त्याची तीव्रताही 4.1 रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपामध्ये कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही.









