उद्घाटनाची तयारी जोरदार, : आतापर्यंत 90 टक्के काम पूर्ण,उद्घाटनासाठी दहा हजार नागरिकांची आसनव्यवस्था
पणजी/ प्रतिनिधी
मोप विमानतळ प्रकल्पाच्या उद्घाटनाची तयारी जोरदारपणे सुरू आहे. आतापर्यंत प्रकल्पाचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रधानमंत्री कार्यालयातून 11 डिसेंबरच्या उद्घाटनाची तारीख निश्चित होईल. या प्रकल्पातील टर्मिनसच्या आतील भागातील कामासाठी अडीच हजार कर्मचारी कार्यरत आहेत. तर एकूण पाच हजार कर्मचारी सध्या अंतिम टप्प्यातील कामावर लक्ष केंद्रित करीत आहेत.
विमानतळ प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी भव्य शामियाना उभारण्यात येणार असून सुमारे दहा हजार नागरिकांची बसण्याची व्यवस्था तिथे करण्यात येणार आहे. विमानतळावरील पॅसेंजर टर्मिनसच्या सजावटीचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. एकूण 65 हजार चौरस मीटर क्षेत्रात बांधकाम झालेले असून एकाचवेळी त्यात साधारणतः दहा हजारपेक्षा जास्त प्रवासी बसण्याची क्षमता आहे. सध्या या टर्मिनसमधील अंतिम रंगरंगोटी केली जात आहे.
राज्याचे मुख्य सचिव आणि विमानतळ अधिकारी तसेच जीएमआर कंपनीच्या अधिकाऱयांबरोबर महत्त्वाची बैठक नुकतीच घेण्यात आली. त्यात उद्घाटनच्या समारंभासंदर्भात चर्चा करण्यात आली आहे. मोप विमानतळापर्यंत जाण्यासाठीचा रस्ता सरकारने हॉटमिक्सिंगद्वारे पूर्ण केला आहे. तसेच रस्त्याच्या दुतर्फा पथदीपही बसविण्यात आले आहेत. विमानतळाच्या प्रवेशद्वारापासून आतमध्ये सर्वत्र विविध प्रकारची झाडे तसेच हिरवळही बसविण्यास आली आहे. 12 डिसेंबर रोजी गुजरातमध्ये निवडणूक असल्याने पंतप्रधान 11 डिसेंबर रोजी उद्घाटनास येतील. दहा डिसेंबरला प्रचाराची सांगता होणार आहे. तोपर्यंत पंतप्रधान गोव्यात येणे शक्मय नाही.
दरम्यान विमानतळ प्रकल्पावर सध्या 5000 कर्मचारी दिवस-रात्र राबत असून संपूर्ण परिसरात सध्या विविध प्रकारची झाडे लावणे, हिरवळ बसविणे, विजेचे खांब उभारणे विविध प्रकारचे बोर्ड लावणे तसेच टर्मिनसच्या बाहेरून शेड उभारून त्यात येणाऱया गाडय़ा पार्किंगकरिता व्यवस्था करणे आदी कामे युद्धपातळीवर चालू आहेत.
विमानतळावर एकूण 32 मोठे स्टॉल्स
विमानतळावर एकूण 32 मोठे स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. त्यात कपडे, पुस्तके, खाद्यपदार्थ तसेच विविध प्रकारच्या वस्तूंची विक्री तसेच हॉटेलची व्यवस्था करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत सात देशी विमान कंपन्यांनी या ठिकाणाहून जानेवारीपासून विमाने सुरू करण्याचा प्रस्ताव जीएमआर कंपनीला दिला आहे. तर विदेशातील अकरा विमान कंपन्यांनी देखील मोप विमानतळासाठी नोंदणी केली आहे.









