ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्यात बांग्लादेशी घुसखोर मोठय़ा संख्येने स्थायिक झाल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेच्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. पुण्यात तब्बल 5 हजार बांग्लादेशी कुटुंबासह स्थायिक असून, मागील 3 वर्षात केवळ 5 बांग्लादेशींना मायदेशी पाठविण्यात आले आहे.
सीमारेषा ओलांडून बांग्लादेशी नागरिक बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करतात. भारतात आल्यावर ते बांधकाम मजूर, फेरीवाले, वेटर अशी कामं करतात. त्यानंतर हळूहळू ते भाडय़ाच्या खोल्यांमध्ये कुटुंबासह स्थायिक होतात. ते मूळचे पश्चिम बंगालचे असल्याचे सांगतात. मागील काही वर्षात पुण्याच्या वाघोली, चाकण औद्योगिक क्षेत्र, हडपसर ससाणेनगर, लोणीकाळभोर या भागात बांग्लादेशींनी बस्तान बसवलं आहे.
पुण्यात जवळपास 5 हजार बांग्लादेशी कुटुंबासह स्थायिक झाले आहेत. त्यामधील केवळ 5 जणांची ओळख पटली असून, त्यांना मायदेशी पाठविण्यात आले आहे. दरम्यान, बांग्लादेशी घुसखोर शोधणे, त्यांची ओळख पटवून त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करणे. त्यांचे कोणी साथीदार आहेत का? त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का? या सर्वांचा तपास करण्याचे पोलिसांना आदेश आहेत.