बलुचिस्तानमध्ये लष्कराच्या वाहनावर आयईडीद्वारे हल्ला
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
बलुचिस्तानमधील मांड येथे आयईडी स्फोटाची घटना समोर आली आहे. या घटनेत पाच पाकिस्तानी लष्करी जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती सोमवारी सायंकाळी जारी करण्यात आली. मांड येथील शांड भागात एका वाहनाला लक्ष्य करून हा स्फोट करण्यात आला आहे. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांची ओळख कॅप्टन वकार काकर, नाईक जुनैद, नाईक इस्मत, लान्स नाईक खान मुहम्मद आणि शिपाई झहूर अशी आहे. आयईडी स्फोटात पाकिस्तानी लष्कराच्या वाहनाला लक्ष्य करण्यात आले होते. या हल्ल्यात एकूण 5 सैनिक ठार झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे.
यापूर्वी मे महिन्याच्या सुरुवातीला बलुचिस्तानमध्ये एका वाहनाला आयईडीने धडक दिल्याने पाकिस्तानी लष्कराचे बारा सैनिक ठार झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या फुटीरतावादी गटाने (बीएलए) घेतली होती. या स्फोटात लष्कराच्या वाहनात प्रवास करणारे 12 सैनिक ठार झाले होते. मृतांमध्ये स्पेशल ऑपरेशन कमांडर तारिक इम्रान आणि सुभेदार उमर फारुख यांचा समावेश होता. या स्फोटात वाहन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. परिसरात उपस्थित असलेल्या कोणत्याही दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबविण्यात आली आहे.









