ऑनलाईन टीम / तरुण भारत :
भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या कसबा विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून पाच संभाव्य नावे निश्चित करण्यात आली आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या संभाव्य उमेदवारांची यादी दिल्ली हायकमांडला पाठवणार आहेत. या पाच नावांमधूनच प्रदेश काँग्रेसच्या वतीने एक नाव निश्चित करण्यात येणार आहे.
प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी नगरसेवक रविंद्र धंगेकर, माजी महापौर कमल व्यवहारे, बाळासाहेब दाभेकर आणि संगीता तिवारी ही पोटनिवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. त्यांनी पटोले यांची भेट घेऊन निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. नाना पटोले या पाच संभाव्य उमेदवारांची नावे दिल्ली हायकमांडला पाठविणार आहेत.
कसबा हा काँग्रेसचा परपरांगत मतदारसंघ आहे. त्यामुळे निवडणूक जाहीर होताच काँग्रेसने निवडणूक लढण्याची तयारी सुरु केली. या पोटनिवडणूकीसाठी आमदार संग्राम थोपटे यांची पक्षाच्या निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या पोटनिवडणूकीसाठीची अधिसूचना 31 जानेवारी रोजी जारी करण्यात येणार असून, 7 फेब्रुवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे.








