कर्तव्यात कसूर : असभ्य वर्तणूक केल्याचा ठपका : पोलीस खात्याची प्रतिमा होतेय मलीन : पोलीस दलाबद्दल जनतेत उलटसुलट चर्चा
बेळगाव : कर्तव्यात कसूर करण्यासह वकिलांसोबत गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत गेल्या 20 दिवसात शहरातील दोन पोलीस निरीक्षकांसह पाच पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. खात्यांतर्गत केलेल्या कारवाईमुळे पोलीस आयुक्तालयाची प्रतिमा दिवसेंदिवस मलीन होत चालली आहे. पोलीस यंत्रणा कायदा व सुव्यवस्था राखण्यासह गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यात अपयशी ठरल्याने पोलीस दलाबद्दल जनतेत उलटसुलट चर्चा ऐकावयास मिळत आहे. अल्ताफ मुल्ला पोलीस निरीक्षक कॅम्प, मंजुनाथ हिरेमठ पोलीस निरीक्षक बेळगाव ग्रामीण, बी. ए. नावकोडी पोलीस कॉन्स्टेबल खडेबाजार, मल्लाप्पा हडगीनाळ कॉन्स्टेबल कॅम्प आणि बी. बी. सुणगार हवालदार एपीएमसी पोलीसस्थानक अशी गेल्या 20 दिवसांत निलंबित झालेल्या पोलिसांची नावे आहेत.
काँग्रेस पक्षाच्यावतीने येथील सीपीएड मैदानावर काँग्रेस मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या ठिकाणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या भाषण करत असताना भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी काळे ध्वज दाखवून घोषणाबाजी केली होती. त्यामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्या चांगलेच संतापले होते. मेळाव्यात घुसून राडा करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासह बंदोबस्तात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिसांवर खात्यांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली होती. मेळाव्यासंबंधी गुप्त माहिती गोळा करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत उत्तर परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक तथा प्रभारी पोलीस आयुक्त डॉ. चेतनसिंग राठोड यांनी खडेबाजारचे कॉन्स्टेबल बी. ए. नावकोडी आणि कॅम्पचे कॉन्स्टेबल मल्लाप्पा हडगीनाळ यांना 29 एप्रिल रोजी निलंबित केले होते. या प्रकरणाशी संबंधित चौकशी सुरू असताना कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत कॅम्प पोलीस स्थानकाचे निरीक्षक अल्ताफ मुल्ला यांच्यावरही 8 मे रोजी निलंबनाची कारवाई करण्यात आली.
त्यानंतर एपीएमसी पोलीस स्थानकात गेलेल्या एका वकिलाशी असभ्य वर्तणूक केल्याचा ठपका ठेवत एपीएमसीचे हवालदार बी. बी. सुणगार यांना पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी 13 मे रोजी निलंबित केले आहे. हवालदारांवर निलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी बेळगाव बार असोसिएशनच्यावतीने पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले होते. त्यातच संतिबस्तवाड येथील प्रार्थनास्थळावरून धर्मग्रंथ पळवून नेत तो जाळण्यात आल्याने राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
यापूर्वीही बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या संतिबस्तवाड येथील युवती बेपत्ता, त्यानंतर घडलेल्या नाट्यामय घडामोडी व ईदगाहच्या घुमटाला धक्का पोहोचविण्यात आला होता. मात्र, जुन्या प्रकरणांचा तपास करण्यात पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ यांनी दुर्लक्ष केले होते. धर्मग्रंथ जाळल्याने निरीक्षक हिरेमठ यांना निलंबित करावे, अशी मागणी पुन्हा जोर धरू लागली होती. त्यामुळे पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी 17 मे रोजी मंजुनाथ हिरेमठ यांनाही निलंबित केले आहे. 29 एप्रिल ते 17 मे या 20 दिवसांच्या काळात पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारित येणाऱ्या चार पोलीस स्थानकांच्या हद्दीतील पाच पोलिसांना निलंबित केल्याने पोलीस दलाची प्रतिमा डागाळली आहे.
मेजर सर्जरी गरजेची
पोलीस खात्यात शिस्तीला महत्त्व आहे. मात्र, शहरातील पोलीस यंत्रणा सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. चोऱ्या, दरोडे, खून, मारामारी आदी प्रकारचे गुन्हे सातत्याने घडत असले तरी त्यावर नियंत्रण आणण्यात पोलिसांना म्हणावे तसे यश आलेले नाही. त्यामुळे मलीन झालेली पोलीस यंत्रणेची प्रतिमा सुधारण्यासाठी खात्यावर मेजर सर्जरी करणे गरजेचे असल्याचे मत जाणकारांतून व्यक्त केले जात आहे.









