गौंडवाड क्रॉसजवळ घडली होती घटना
प्रतिनिधी/ बेळगाव
बकरी चरण्यावरून वाद झाला. त्यानंतर पुन्हा एकदा मारहाणीची घटना घडली. हा राग सतत मनात धरत पाच जणांनी एका व्यक्तीचा खून केल्याची घटना गौंडवाड क्रॉस, यमनापूरजवळ घडली होती. या प्रकरणातील संशयित आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
संतोष सिद्धाप्पा केंप, सिद्धाप्पा यल्लाप्पा केंप, ईश्वर हालाप्पा हालभांवी (सर्व रा. लक्ष्मी गल्ली, मुत्यानट्टी), रवी बस्सू कुंबरगी, विवेक कऱ्याप्पा नाईक (दोघे रा. कंग्राळी) अशी त्यांची नावे आहेत. या सर्वांनी यल्लाप्पा हालाप्पा गोरव (रा. मुत्यानट्टी) याचा खून केल्याचा आरोप होता.
याबाबत अधिक माहिती अशी, मयत यल्लाप्पा व संशयित आरोपीमध्ये बकरी चारण्यावरून वाद झाला होता. त्यानंतर मयत व्यक्ती काकती येथे दूध देण्यासाठी गेला असता तेथेही जोरदार भांडण झाले होते. वारंवार संशयित आरोपी आणि मयत यांच्यामध्ये वादावादी झाली होती. दि. 22 नोव्हेंबर 2019 रोजी रात्री 9.30 च्या दरम्यान मयत यल्लाप्पा हे हिंडाल्को फॅक्टरीमध्ये रात्रपाळीला कामाला जात होते. कामाला जात असताना त्यांना गौंडवाड क्रॉसजवळ अडवून त्यांच्याशी या सर्वांनी वादावादी केली. त्यानंतर संशयित आरोपी संतोषने तलवारीने हल्ला केला. यामध्ये यल्लाप्पा हे गंभीर जखमी झाले. संशयितामधील आणखी एकाने कोयत्याने हल्ला केला होता. यात यल्लाप्पा यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर काकती पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्यावर भा.दं.वि. 143, 147, 148, 341, 504, 302 कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. सहावे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयामध्ये दोषारोप दाखल केले होते. त्याठिकाणी 17 साक्षीदार, 78 कागदपत्रे पुरावे, 21 मुद्देमाल तपासण्यात आले. मात्र सरकारी पक्षाला गुन्हा साबीत करता आला नाही. त्यामुळे या सर्वांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. संशयितांच्यावतीने अॅड. शामसुंदर पत्तार, अॅड. हेमराज बेंचन्नावर, अॅड. शंकर बाळनाईक, अॅड. चिदंबर होनगेकर, अॅड. विशाल चौगुले, अॅड. जोतिबा पाटील यांनी काम पाहिले.









