ब्रेन डेड’ झालेल्या डिचोलीतील मजुराचा आदर्श : आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याकडून सर्वांचे आभार,‘ग्रीन कॉरिडॉर’ बनवून अवयवांची सुखरूप वाहतूक
पणजी : ब्रेन डेड घोषित करण्यात आलेल्या रुग्णाच्या दानी वृत्तीमुळे देशातील तब्बल पाच रुग्णांना नवजीवन मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. हृदय, यकृत, फुफ्फुसे, मूत्रपिंड यासारख्या स्वअवयवांच्या माध्यमातून तो आता पाच जणांच्या शरीरात राहणार आहे. हे महान कार्य गोमेकॉत घडले असून सदर ऊग्णापेक्षा त्याच्या पत्नीने घेतलेल्या धाडसी निर्णयाबद्दल सरकार तिचे आभारी राहील, असे कृतज्ञतापूर्वक उद्गार आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी काढले. जबलपूर मध्यप्रदेश येथील एक 25 वर्षीय तरुण डिचोली येथे एका बांधकाम साईटवर मजुरी करत होता. नुकताच म्हापसा येथे एका अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर गोमेकॉत उपचार सुरू होते. परंतु मेंदूला गंभीर दुखापत असल्यामुळे त्याला वाचवता आले नाही. परिणामी त्याला ‘ब्रेन डेड’ घोषित‘ करण्यात आले होते. या रुग्णाच्या पश्चात पत्नी आणि तीन मुले असा परिवार आहे.
पत्नीचा धाडसी निर्णय
सदर रुग्णाचे अन्य सर्व अवयव सुस्थितीत होते. त्यामुळे सदर अवयव दान करण्यासंबंधी गोमेकॉकडून विनंती करण्यात आली. त्यावेळी त्याच्या पत्नीने नि:स्वार्थ आणि तेवढाच धाडसी निर्णय घेतला आणि अवयवदानासाठी संमती दिली. त्यानंतर लगेचच जीएमसीच्या न्यूरोलॉजी विभाग प्रमुख डॉ. टेरेसा फरेरा, आणि मेडिसिन विभागाच्या साहाय्यक प्राध्यापक डॉ. रुक्मा कोलवाळकर यांनी ब्रेन स्टेम डेथ सर्टिफिकेशन केले. त्याचे मूत्रपिंड सध्या प्रतीक्षा यादीत असलेल्या 35 आणि 36 वर्षीय दोन महिला रुग्णांना प्रत्यारोपणासाठी वाटप करण्यात आले. त्याचे हृदय मुंबईत रिलायन्स इस्पितळात उपचार घेणाऱ्या 55 वर्षीय पुऊषाला देण्यात आले. यकृताचे वाटप अहमदाबाद येथे झायडस इस्पितळात दाखल एका 39 वर्षीय पुऊषाला देण्यात आले. फुफ्फुसासाठी कोणताही रुग्ण प्रतीक्षा यादीत नसल्याने ‘नोट्टो’ च्या माध्यमातून दिल्लीत अपोलो इस्पितळाकडे सुपूर्द करण्यात आले, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. अशाप्रकारे या दानाप्रती कृतज्ञता म्हणून गोमेकॉचे डीन प्रा. डॉ. शिवानंद बांदेकर यांनी सदर अवयवदात्याचे पार्थिव त्याच्या मूळ गावी जबलपूर येथे पोहोचविण्याचे वचन दिले.
अवयव वाहतुकीसाठी तीन ‘ग्रीन कॉरिडॉर’
दरम्यान, एखाद्या दात्याने अवयव दान केले तरी ते निर्धारित वेळेतच प्राप्तकर्त्याच्या रुग्णालयात पोहोचणे महत्त्वाचे असते. त्यामुळे या अवयवांची सुरळीत वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी मोप आणि दाबोळी या दोन्ही आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत तीन ‘ग्रीन कॉरिडॉर’ निर्माण करण्यात आले होते. त्यासाठी ‘सोटो’ गोवा, 108 सेवा, वाहतूक पोलिस विभाग आणि दोन्ही विमानतळांवरील अधिकारी यांच्यात उत्कृष्ट समन्वय साधण्यात आला होता. त्यामुळेच गोमेकॉपासून दोन्ही विमानतळांपर्यंत अवयव घेऊन जाणाऱ्या पथकांचा मार्ग सूकर झाला.









