वृत्तसंस्था/लखनौ
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे गुरुवारी सकाळी एका चालत्या एसी बसला आग लागली. या अपघातात पाच प्रवाशांचा जळून मृत्यू झाला. मृतांमध्ये आई-मुलगी, भाऊ-बहीण आणि एका तरुणाचा समावेश आहे. बसमध्ये सुमारे चाळीस प्रवासी होते. स्लीपर बस बिहारमधील बेगुसरायहून दिल्लीला जात होती. मोहनलालगंजजवळील आउटर रिंग रोड (किसान पथ) वर पहाटे 4.40 वाजता हा अपघात झाला. याप्रसंगी बहुतेक प्रवासी झोपले होते.
बसमध्ये आग लागल्याची कल्पना येताच प्रवाशांनी बचावासाठी प्रयत्न सुरू केल्याने चेंगराचेंगरी झाली. बस चालत असतानाच अचानक धुराने भरू लागली. लोकांना काहीच समजले नाही. काही मिनिटांतच आगीच्या जोरदार ज्वाळा उठू लागल्या, असे प्रवाशांनी सांगितले. घटनेनंतर चालक आणि कंडक्टर बस सोडून पळून गेले. आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना आणि अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचेपर्यंत संपूर्ण बस जळून खाक झाली होती. अग्निशमन दलाने सुमारे 30 मिनिटांत आग विझवली. बचावकार्यानंतर पाच जळालेले मृतदेह निदर्शनास आले.









