दहा-बारा घरे बेचिराख : मुझफ्फरपूरमधील वसाहतीत दुर्घटना : हाय टेन्शन वायर पडल्याने अग्नितांडव
► वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये बुधवारी दलित वस्तीतील 50 हून अधिक घरांना आग लागली. यापैकी दहा-बारा घरे पूर्णपणे बेचिराख झाली आहेत. या अपघातात चार मुलांसह पाच जणांचा जळून मृत्यू झाला. या अग्नितांडवावेळी 15 ते 20 मुले आगीपासून वाचण्यासाठी इकडे तिकडे धावत होती. मात्र, बऱ्याचशा मुलांना वाचविण्यात लोकांना यश आले आहे. विद्युतभारीत हायटेन्शन वायर तुटून पडल्याने ही दुर्घटना घडल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
मुजफ्फरपूर जिल्ह्यातील रामपूर मणी गावात आगीची दुर्दैवी घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, बरीचशी घरे वेगाने पसरणाऱ्या आगीच्या विळख्यात सापडल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.
मिठाईच्या दुकानात सिलिंडरचा स्फोट
मुझफ्फरपूरमध्ये आगीची अन्य एक घटना भगवानपूर यादव नगर चौकात घडली. एका मिठाईच्या दुकानात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने भीषण आग लागल्यानंतर एकामागून एक अनेक स्फोट झाले. दुकानात अनेक सिलिंडर ठेवले होते. स्थानिक लोकांनी मदतीसाठी मदतीसाठी धाव घेत अनेक सिलिंडर बाहेर काढले. या घटनेवेळी परिसरात प्रचंड धावपळ निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी पोहोचल्या. सुमारे 2 तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले. या अपघातात नजिकची 5 दुकाने जळून खाक झाली.








