अमलीपदार्थांविरोधात मार्केट-माळमारुती पोलिसांची कारवाई सुरूच
बेळगाव : सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन केल्याच्या आरोपावरून मार्केट व माळमारुती पोलिसांनी पाच तरुणांना अटक केली आहे. अमलीपदार्थांची विक्री करणाऱ्यांबरोबरच सेवन करणाऱ्यांविरुद्धही पोलीस दलाने कारवाईचा सपाटा सुरूच ठेवला आहे. मार्केटचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर यांनी समर्थनगर, दुसरा क्रॉस परिसरात विजय संजय काविलकर (वय 21) या तरुणाला ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी केली असता त्याने गांजा सेवन केल्याचे स्पष्ट झाले आहे. तर बागवान गल्लीजवळ विनायक परशुराम गडकरी, राहणार लक्ष्मी गल्ली, सुळगा याला गांजा सेवन केल्याच्या आरोपावरून ताब्यात घेण्यात आले आहे.
माळमारुतीचे पोलीस उपनिरीक्षक श्रीशैल हुळगेरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी जुने गांधीनगर ऑटोरिक्षा स्टँडजवळ सिदराई बसप्पा कुपनी ऊर्फ नाईक (वय 31) राहणार पणगुत्ती याला गांजा सेवन केल्याप्रकरणी अटक केली आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्याने अमलीपदार्थ सेवन केल्याचे स्पष्ट झाले आहे. माळमारुतीचे पोलीस उपनिरीक्षक पी. एम. मोहिते यांनी गँगवाडी सर्कलजवळ बसवराज फकिराप्पा नाईक (वय 31) राहणार गुटगुद्दी, ता. हुक्केरी याला तर पोलीस उपनिरीक्षक उदय पाटील यांनी उज्ज्वलनगर तिसऱ्या क्रॉसजवळ बसवराज सन्नयल्लाप्पा ऊर्फ सन्नकल्लाप्पा नाईक (वय 29) राहणार गुटगुद्दी, ता. हुक्केरी याला उज्ज्वलनगरजवळ अटक केली आहे. या दोघा जणांनीही गांजा सेवन केल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी ही माहिती दिली आहे.









