कराड :
कराड शहर व परिसरात ड्रग्ज व गांजाची विक्री करण्रायांवर पोलीस उपअधीक्षक कार्यालयाच्या पथकाने मंगळवारी कारवाई केली. यामध्ये ओगलेवाडी परिसरातून सुमारे 50 हजार रूपये किमतीचे 10 ग्रॅम वजनाचे ड्रग्ज जप्त केले आहे. तसेच दुस्रया एका कारवाईमध्ये पोलिसांनी कराडातील मुजावर कॉलनी परिसरातून गांजा जप्त केला आहे. या दोन वेगवेगळ्या कारवाईप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर यांना कराड तालुक्यात ड्रग्ज व गांजा विक्री करण्रायांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने वेगवेगळी पथके तयार केली होती. पथकाने ओगलेवाडी येथे सापळा रचून छापा टाकला असता तेथे (एमडी) ड्रग्ज विक्री करताना तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुमारे 50 हजार रूपये किमतीचे 10 ग्रॅम वजनाचे (एमडी) ड्रग्ज ताब्यात घेण्यात आले असून यामधील एकजण रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
तसेच मुजावर कॉलनी परिसरात गांजा विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथेही छापा टाकला असता तेथे पोलिसांना गांजा मिळून आला. गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुजावर कॉलनी व बुधवार पेठ येथील एकास ताब्यात घेतले आहे.








