वृत्तसंस्था/ रांची
झारखंडमधील चतरा येथे सोमवारी झालेल्या चकमकीत पाच नक्षलींना कंठस्नान घालण्यात आले. मृतांपैकी दोन नक्षलवाद्यांवर प्रत्येकी 25 लाखांचे बक्षीस होते. तर अन्य दोघांवर 5-5 लाखांचे बक्षीस होते. या चकमकीनंतर घटनास्थळावरून एके-47 बंदुकांसह मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. या संघर्षानंतर सायंकाळपर्यंत परिसरात सुरक्षा दलांची शोधमोहीम सुरू होती. तसेच बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आला होता.
झारखंडमधील लातेहार, पलामू आणि चतरा जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातील लावलाँगमधील रिमी गावाजवळ काही नक्षलवादी असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना प्राप्त झाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाने शस्त्रसज्ज होत विशेष मोहीम राबवत पाच जणांचा खात्मा केला. सकाळी 9 वाजता कोब्रा 203 पथक आणि नक्षलवाद्यांमध्ये संघर्ष झाला. यात 25 लाखांचे बक्षीस असलेले नक्षलवादी गौतम पासवान आणि चार्ली ठार झाले आहेत. तसेच नंदू, अमर गंझू आणि संजीव भुईया हे तीन उप-विभागीय कमांडरही मारले गेले आहेत. गौतम पासवान हा या भागात म्होरक्या म्हणून वावरत होता. आजुबाजुच्या जिह्यात तो सक्रिय असल्यामुळे सुरक्षा दलाकडून त्याच्यावर लाखो ऊपयांचे बक्षीस लावण्यात आले होते.
संयुक्त कारवाईचे मोठे यश
एसपी राकेश रंजन यांच्या सूचनेवरून सुरक्षा दलांनी पलामू-चतरा सीमेवर नक्षलींविरोधात कारवाई सुरू केली. या कारवाईत सीआरपीएफ कोब्रा बटालियन, जेएपी, आयआरबी तसेच पलामू आणि चतरगचे जिल्हा सैन्य तैनात करण्यात आले होते. चकमकीच्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात नक्षलवादी साहित्य जप्त करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. सुरक्षा दलाच्या संयुक्त कारवाईचे हे मोठे यश असल्याचे राकेश रंजन यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.









