वनमंत्री विश्वजित राणे यांची माहिती
पणजी : सुर्ला मोले येथील दोन डोंगरांना लागलेली आग तसेच पोत्रे नेत्रावळी, कोपार्डे, शिगाव इत्यादी वनक्षेत्रांची आग चालूच आहे. आजपासून पाऊस झाल्यास गोव्यातील वन क्षेत्र वाचविण्यात मोठी मदत होईल. गेल्या 24 तासात केरी, कुळे, बोरी, ओकांबी-पिळये, दोंग्रे, कुर्डी, कोळंब आणि कुमारी नेत्रावळी येथील वनक्षेत्राला लागलेली आग विझविण्यात यश आले आहे. वनमंत्री विश्वजित राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार अद्याप 5 डोंगरांना आगीने वेढलेले आहे. नौदलाच्या दोन हेलिकॉप्टर्सनी पाण्याचे फवारे मारुन काही ठिकाणी आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे. अद्याप 450 वनकर्मचारी आग आटोक्यात आणण्यासाठी झटत आहेत. त्याचबरोबर सत्तरीतील सामाजिक क्षेत्रातील युवकांनी देखील रविवारी व सोमवारी जंगलात जाऊन आग आटोक्यात आणण्यासाठी अथक प्रयत्न केले. दरम्यान, आजपासून गोव्यात पुढील 4 ते 5 दिवस पाऊस पडण्याची शक्यता असल्याने गोव्यातील आग विझविण्यासाठीच निसर्गाने त्याला पाठविले असावे असे दिसतेय. आज पाऊस पडल्यास बऱ्यापैकी आग नियंत्रणात येईल, किंबहुना सर्वच ठिकाणची आग विझून जाईल, अशी चर्चा होत आहे.









