पुणे / वार्ताहर :
पुण्यातील डेक्कन परिसरातील नामांकित हॉटेलची थाळी ऑनलाईन घरपोच मागविण्यासाठी फेसबुकवरील एका जाहिरातीत दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधलेल्या दोन ग्राहकांना भामटयाने पाच लाखांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे.
पहिल्या प्रकरणात येरवडा पोलीस ठाण्यात विनोद नारायण आचारी (वय-44, रा. येरवडा, पुणे) यांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार गोपीनाथ अर्जुन मारंडी (रा.ओरिसा) व साक्षीकुमारी विष्णुदेव प्रसाद (रा.बिहार) या आरोपींवर फसवणूक व आयटी ऍक्ट 66 डी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद आचारी यांना 7/8/2022 रोजी आरोपींनी फोन करुन सुकांता थाळीची ऑर्डर घेतो, काही ऑर्डर असल्यास घरपोच देण्यात येईल, असे सांगितले. त्यानुसार त्यांना मोबाईलमध्ये एक ऍप डाऊनलोड करण्यास सांगितले व त्यात तक्रारदार यांना त्यांच्या क्रेडीट कार्डची माहिती भरण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांच्या संमती शिवाय त्यांच्या आयसीआयसीआय बँकेच्या खात्यातून एकूण तीन लाख 34 हजार रुपये परस्पर काढून घेत फसवणूक करण्यात आली आहे.
तर, दुसऱ्या घटनेत कोरेगाव पार्क या उच्चभ्रु परिसरात राहणाऱया सुशिल विनोदकुमार खंडेलवाल (वय-39) यांनी अज्ञात मोबाईल धारकाविरोधात कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. 27/8/2022 रोजी सुशील खंडेलवाल यांच्या पत्नीने फेसबुकवर सुकांता थाळीची जाहिरात पाहिली. त्यानुसार मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता, अनोळखी आरोपीने त्यांच्या मोबाईलचा ऍक्सेस घेण्यासाठी ऍप डाऊनलोड करण्यास सांगून त्यात त्यांना त्यांची क्रेडीट कार्डची माहिती भरण्यास सांगितली. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून परस्पर एक लाख 52 हजार रुपये काढून घेत त्यांची फसवणूक करण्यात आली आहे.








