चिपळूण :
चिपळूण-कराड मार्गावरील पिंपळी खुर्द येथील वाशिष्ठी दूध डेअरी परिसरात एका भरधाव वेगातील थारने रिक्षाला धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली. यात रिक्षाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. मृतांमध्ये थार व रिक्षा चालकासह रिक्षात बसलेले पुणे येथील पती-पत्नी आणि त्यांच्या 3 वर्षाच्या बालकाचा समावेश आहे.
अपघातप्रकरणी मृत थार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अपघातापूर्वी थार चालक व त्याची मैत्रिण यांचा कारमध्येच वाद विकोपाला जाऊन तिने चालत्या कारमधून उडी मारल्याची बाब पुढे आली आहे.
आसिफ हकिमुद्दीन सैफी (28, देहारादून-उत्तराखंड) असे गुन्हा दाखल झालेल्या मृत थार चालकाचे नाव आहे. तर रिक्षा चालक इब्राहीम इस्माईल लोणे (62, पिंपळी-नुरानी मोहल्ला), नियाज मोहमद हुसेन सय्यद (50), शबाना नियाज सय्यद (40), हैदर नियाज सय्यद (3, सर्व शिवदर्शन पर्वती-पुणे) अशी ठार झालेल्या अन्य चार जणांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद अमोल पांडुरंग कदम (41, खेर्डी-विकासवाडी) यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यद कुटुंबातील एक मुलगा पिंपळी येथे मदरशामध्ये शिक्षण घेत आहे. त्याला भेटून हे कुटुंब पुन्हा पुण्याच्या दिशेने जाणार होते. चिपळूण रेल्वे स्थानकाकडे येण्यासाठी ते इब्राहिम लोणे यांच्या रिक्षातून येत होते. त्याचवेळी गोव्याहून थार चालक आसिफ सैफी हा पुण्याच्या दिशेने जात असताना ही दोन्ही वाहने पिंपळी खुर्द येथील वाशिष्ठी दूध डेअरी परिसरात आली. यावेळी भरधाव वेगात असलेला आसिफ सैफी याने विरुद्ध बाजूला येऊन रिक्षाला समोरासमोर धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, थारने रिक्षाला उडवत नेऊन ही दोन्ही वाहने रिक्षा मागे असलेल्या अमोल कदम यांच्या गॅस सिलिंडरच्या ट्रकवर जाऊन जोरदार आदळली.
या अपघातात रिक्षाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. रिक्षा चालक इब्राहीम लोणे, नियाज सय्यद, शबाना सय्यद, हैदर सय्यद तर स्वत: कार चालक आसिफ सैफी हे पाच जण जागीच ठार झाले. या घटनेची माहिती चिपळूण पोलिसांना मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले, पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे आदींसह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. स्थानिक व पोलिसांच्या मदतीने क्रेन मागवून चार जणांना चक्काचूर झालेल्या रिक्षामधून काही तासाच्या प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आले.
- मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात
अपघातातील जागीच ठार झालेले इब्राहिम लोणे, नियाज सय्यद, शबाना सय्यद, हैदर सय्यद तर आसिफ सैफी याचे मृतदेह विच्छेदनासाठी कामथे रुग्णालयात आणण्यात आले. विच्छेदनानंतर इब्राहीम लोणे तसेच नियाज सय्यद, शबाना सय्यद, हैदर सय्यद याचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. नियाज सय्यद हे बांधकामाचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. कार चालक आसिफ यांचे नातेवाईक मंगळवारी उशिरापर्यंत चिपळुणात दाखल झाले नव्हते.
- मृत थार चालकावर गुन्हा दाखल
भरधाव वेगातील थार चालक आसिफ सैफीने रिक्षाला दिलेल्या धडकेनंतर या भीषण अपघातात त्याच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघातप्रकरणी मृत थार चालक आसिफ याच्यावर चिपळूण पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
- मैत्रिणीने घेतली कारमधून उडी अन् पुढे झाला अपघात
आसिफ सैफी हा आपल्या मैत्रिणीसोबत गोव्याला फिरण्यासाठी गेला होता. गोवा फिरून झाल्यावर ते दोघेजण पुणे येथे जाताना चिपळुणात त्या दोघांमध्ये चालत्या कारमध्येच वाद झाला. यावेळी ती कारमधूनच ‘हेल्प मी, हेल्प मी’ असे ओरडत होती. अशातच दोघांमधील वाद विकोपाला गेल्यानंतर त्या मैत्रिणीने थेट चालत्या गाडीतून महामार्गावर शहरातील रावतळे येथे उडी मारली. मात्र तिला तशीच सोडून आसिफ भरधाव वेगाने पिंपळीच्या दिशेकडे निघून गेला. ज्याठिकाणी या तरुणीने थारमधून उडी मारली, तेव्हा मागे खेर्डी येथील एका नागरिकाची कार होती. त्याने आपली कार थांबवून त्या तरुणीची चौकशी करत याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानुसार पोलिसांनी त्या तरुणीला पोलीस ठाण्यात आणले. तर पुढे झालेल्या अपघातात आसिफचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त ठिकाण आणि तरुणीने उडी मारलेल्या ठिकाणामधील अंतर सहा ते सात कि. मी. एवढे आहे. दरम्यान, मंगळवारी दिवसभर तरुणी पोलिसांच्या ताब्यात होती.








