नॉर्थ कॅरोलिनामधील घटनेत हल्लेखोराला अटक
न्यूयॉर्क / वृत्तसंस्था
अमेरिकेतील उत्तर कॅरोलिना प्रांतात शुक्रवारी एका बंदुकधाऱयाने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका पोलीस अधिकाऱयाचाही समावेश आहे. या घटनेनंतर हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांनी व्यापक मोहीम हाती घेतल्यानंतर अवघ्या तासाभरात संबंधिताच्या मुसक्या आवळण्यात आल्या. संशयिताची ओळख आणि घटनेमागचा हेतू तपासकर्त्यांनी उघड केलेला नाही.
बंदुकधाऱयाने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात एका पोलीस अधिकाऱयासह आणखी किमान दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबाराची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱयांनी बंदूकधाऱयाचा शोध घेण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. परिसरात नाकाबंदी करून रस्ते बंद केले आणि रहिवाशांना घरातच राहण्याचा सल्ला दिला. रात्री दहाच्या सुमारास अधिकाऱयांनी संशयिताला एका घरात घेरले आणि अटक केली. या कारवाईदरम्यान गोळीबार होण्याच्या भीतीने अनेक भागातील रहिवाशांना आपापल्या घरातच बंदिस्त राहावे लागले.
गेल्या आठवडाभरातील अमेरिकेत घडलेली गोळीबाराची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी दक्षिण कॅरोलिनामध्ये रविवारी झालेल्या गोळीबारात पाच जणांना जीव गमवावा लागला होता. मुख्यतः देशातील बंदुकांची संख्या आणि शस्त्रास्त्रांच्या खरेदीसंदर्भातील नियमांमुळे अमेरिकेत गोळीबाराच्या घटना सातत्याने घडताना दिसत आहेत.









