37 जण रुग्णालयात दाखल : पाच आरोपींना अटक
वृत्तसंस्था/हैदराबाद
हैदराबादच्या कुकटपल्ली भागात भेसळयुक्त ताडी सेवनामुळे आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 37 जण रुग्णालयात दाखल आहेत. गुरुवारी उलट्या आणि जुलाबाच्या तक्रारींमुळे आणखी सहा रुग्णांना रुग्णालयात आणण्यात आले. त्यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे. शहरातील ‘निम्स’ हॉस्पिटल येथे 31 जणांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, घटनेची चौकशी करणाऱ्या उत्पादन शुल्क विभागाने हैदरनगर, शमशीगुडा आणि केपीएचबी कॉलनीतील ताडी दुकानांवर छापे टाकत पाच जणांना अटक केली आहे. मृत्युमुखी पडलेल्या पाच जणांची ओळख पटली असून सीताराम, स्वरूपा, मौनिका, नारायण आणि बोज्जैया अशी त्यांची नावे आहेत. सर्व मृत कुकटपल्ली परिसरातील रहिवासी आहेत. अबकारी विभागाने 674 लिटर ताडी जप्त केली असून संबंधित दुकाने सील केली. या प्रकरणात एकूण पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सर्वांवर भेसळयुक्त ताडी विकल्याचा आरोप आहे.









