वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालच्या पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील एका बेकायदेशीर फटाके कारखान्यामध्ये झालेल्या भीषण स्फोटात पाच लोकांचा मृत्यू झालेला आहे. सात जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ही माहिती त्या राज्यांच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली. स्फोटाच्या दणक्याने एका खाजगी इमारतीत असणारा हा कारखाना त्या इमारतीसकट पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. ज्येष्ठ भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी या स्फोटाची राष्ट्रीय अनुवेशन प्राधिकरणाकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे. स्फोटानंतर त्यात ठार झालेल्या लोकांच्या शरीराचे अवयव सर्वत्र पसरल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. या स्फोटाची चौकशी राज्याच्या सीआयडीने यापूर्वीच सुरु केली आहे. तरीही केंद्र सरकारला एनआयएकडून चौकशी करायची असल्यास आमचा विरोध नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे.









