अद्याप कोणत्याही गटाने जबाबदारी स्वीकारलेली नाही
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, बामाको
आफ्रिकन देश मालीमध्ये पाच भारतीय नागरिकांचे अपहरण करण्यात आले आहे. दिल्लीतील दुतावास अधिकाऱ्यांनी शनिवारी याची पुष्टी केली. गुरुवारी पश्चिम मालीच्या कौबी प्रदेशात सशस्त्र लोकांनी भारतीयांचे अपहरण केल्याचे सांगण्यात आले. सदर भारतीय नागरिक एका वीज कंपनीत काम करत होते. पाच भारतीयांचे अपहरण करण्याची घटना उघड झाल्यानंतर कंपनीतील उर्वरित भारतीय कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे राजधानी बामाको येथे नेण्यात आले आहे. अद्याप कोणत्याही गटाने अपहरण प्रकरणाची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
माली देशात सध्या लष्करी राजवट असून 2012 पासून देशात अस्थिरता, सत्तापालट आणि जिहादी हल्ले वाढत आहेत. अल-कायदाशी संबंधित जेएनआयएम गट इंधन पुरवठा रोखून आर्थिक संकट वाढवत आहे. मालीमध्ये परदेशी लोकांचे अपहरण करण्याच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. सप्टेंबरमध्ये जेएनआयएमने बामाकोजवळ दोन अमिराती आणि एका इराणी नागरिकाचे अपहरण केले होते. या अपहृतांना गेल्या आठवड्यात सुमारे 5 कोटी डॉलर्स इतकी खंडणी भरल्यानंतर सोडण्यात आले होते.









