वृत्तसंस्था / बँकॉक
19 वर्षांखालील वयोगटातील येथे सुरू असलेल्या आशियाई मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या पाच मुष्टीयोद्धांनी आपल्या वजन गटात उपांत्य फेरी गाठत किमान पाच पदके निश्चित केली आहेत. या स्पर्धेत भारताचे पाच पुरुष तसेच सात महिला मुष्टीयोद्धांनी उपांत्य फेरीत स्थान मिळविले आहे.
पुरूषांच्या विभागात 55 किलो गटात शिवमने, 65 किलो गटात मौसम सुहागने, 75 किलो गटात राहुल कुंडूने, 85 किलो गटात गौरवने तसेच 90 किलो वजन गटात हेमांत सांगवानने प्रतिस्पर्ध्यांवर मात करत उपांत्य फेरीत स्थान मिळविले आहे. या स्पर्धेमध्ये पुरुष आणि महिलांच्या विभागात भारताची 12 पदके निश्चित झाली आहेत. 19 वर्षांखालील तसेच 22 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धा एकाचवेळी होत आहे. 22 वर्षांखालील वयोगटात भारताची 13 पदके निश्चित झाली आहेत. भारताच्या पाच मुष्टीयोद्धे आता सुवर्णपदकासाठी लढत देतील.
या स्पर्धेत सकाळच्या सत्रातील पहिल्या लढतीत भारताच्या शिवमने 55 किलो वजन गटातील लढतीत उझ्बेकच्या अबुदुनाझेरोवचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला. 65 किलो गटात भारताच्या मौसम सुहागने किर्जीस्तानच्या अलिमबेकोव्हवर 3-2 अशा गुण फरकाने निसटता विजय मिळविला. 75 किलो गटात राहुल कुंडूने द.कोरियाच्या जिआँगचा पराभव करत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. 85 किलो गटात भारताच्या गौरवने चीन तैपेईच्या चेंगवर निसटता विजय मिळवित उपांत्य फेरी गाठली. 90 किलो वजन गटात हेमंत सांगवानने उझ्बेकच्या सिडीकोव्हवर मात करत उपांत्य फेरीत स्थान मिळविले. मात्र 90 किलो वरील गटातील लढतीत भारताच्या कृशला इराणच्या अब्बासकडून पराभव पत्करावा लागला.









