हिरुर-तालुका सौंदत्ती येथे पत्नीचा खून करून मृतदेह टाकला होता उसाच्या मळ्यात
बेळगाव : विवाहितेचा खून करून तिचा मृतदेह गावापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतवडीत फेकून दिल्याच्या आरोपावरून सौंदत्ती पोलिसांनी पती, सासू-सासऱ्यासह पाच जणांना अटक केली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी गुरुवारी ही माहिती दिली आहे. दावलबी दिवाणसाब कगदाळ (वय 25) राहणार हिरुर, ता. सौंदत्ती या विवाहितेचा खून करून मृतदेह उसाच्या मळ्यात टाकून देण्यात आला होता. मंगळवार दि. 3 जून रोजी मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी दावलबीच्या माहेरवासियांनी पतीसह तिच्या सासरवासियांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता.
सौंदत्तीचे पोलीस निरीक्षक धर्माकर धर्मट्टी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पती दिवाणसाब कगदाळ, दीर हजरत (वय 25), रफीक (वय 23), सासरे खाजीसाब (वय 65), सासू बीबीजान (वय 50) या पाच जणांना अटक केली आहे. पतीबरोबरच्या भांडणानंतर दावलबी तीन महिने नवलगुंद तालुक्यातील शिरुर येथील आपल्या माहेरी होती. तीन महिन्यांनंतर नांदण्यासाठी दावलबीला सासरी घेऊन येऊन 25 मे रोजी तिचा खून करण्यात आला होता. नशेत असलेल्या पतीबरोबरच्या भांडणानंतर तिचा खून करून मृतदेह उसाच्या मळ्यात टाकण्यात आला होता. सौंदत्ती पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला असून पतीसह पाच जणांना अटक केली आहे.









