बेळगाव : हॉकी क्षेत्रात बेळगावचे नाव पूर्वापार प्रसिद्ध आहे. बेळगावच्या पाच हॉकीपटूंची स्पोर्ट्स हॉस्टेलसाठी निवड झाली असून त्यात चार महिला खेळाडू तर एक पुरुष खेळाडूचा समावेश आहे. हॉकी बेळगाव संघटनेकडे सराव करीत असलेल्या चार महिला हॉकीपटूंचा म्हैसूर येथील युवजन क्रीडा खात्याच्या हॉकी हॉस्टेलमध्ये निवड झाली असून त्यामध्ये आएशा शेख, साक्षी चौगुले, साक्षी पाटील, मयुरी कंग्राळकर तर बळ्ळारी येथील युवा स्पोर्ट्स हॉस्टेलसाठी प्रवीण जक्कन्नावर याची निवड झाली आहे. गेले तीन वर्षे हॉकी बेळगाव संघाने महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी हॉकीचे धडे गिरविले आहेत.
आज मोठ्या प्रमाणात महिला खेळाडूंना प्रोत्साहान दिले जात आहे. पूर्वीच्या काळात ऑलिम्पिकपटू बंडू पाटील व शंकर लक्ष्मण या दोन्ही खेळाडूंना बेळगावचे नाव ऑलिम्पिकपर्यंत पोहोचविले होते. बेळगावच्या लकीस्टार संघाने संपूर्ण भारतात आपला छाप उमटविला होता. यावेळी कर्नाटक व मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटच्या संघात बेळगावच्या हॉकीपटूंचा दबदबा होता. मधील काळात हॉकी परंपरा खंडीत पडली होती. पण प्रकाश चाळके व निवृत्त कॅप्टन उत्तम शिंदे यांनी शाळेतील मुली व मुलांना सतत लेले मैदानावरती सराव घेवून या खेळाडूंना हॉकीचे धडे दिले.
दसरा क्रीडा स्पर्धेत या मुलींच्या संघाने सतत दुसरा किंवा तिसरा क्रमांक पटकाविला आहे. त्यामुळे पुन्हा बेळगावला हॉकीचे वैभव प्राप्त होऊ लागले आहे. आएशा शेख, साक्षी चौगुले, साक्षी पाटील व मयुरी कंग्राळकर या महिला खेळाडूंनी बळ्ळारी येथे झालेल्या निवड चाचणीत सहभाग घेतला होता. त्यांनी केलेल्या उत्तम कामगिरीची दखल घेवून वरील खेळाडूंची स्पोर्ट्स हॉस्टेलसाठी निवड करण्यात आली आहे. वरील सर्व खेळाडूंना शिक्षण व हॉकी प्रशिक्षण मोफत असून संबंधित सर्व खर्च सरकार उचलणार आहे.
निवड झालेल्या महिला हॉकीपटूंपैकी मयुरी कंग्राळकर, साक्षी पाटील, साक्षी चौगुले या मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या खानापूर येथील ताराराणी हायस्कूलच्या विद्यार्थिनी आहेत. तर मयुरी ही खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील रहिवासी असून साक्षी पाटील ही असोगा येथे वास्तव्यास आहे. मुलांमध्ये निवड झालेला प्रवीण जक्कन्नावर हा एम. आर. भंडारी स्कूलचा विद्यार्थी असून या सर्व खेळाडूंना हॉकी प्रशिक्षक कॅप्टन उत्तम शिंदे, सुधाकर चाळके यांचे मार्गदर्शन तर संघटनेचे अध्यक्ष गुळाप्पा होसमनीसह मराठा मंडळ संस्थेच्या संचालिका राजश्री नागराजू यांचे प्रोत्साहन लाभत आहे.









