चार लाखाचा फटका : शेतकऱ्यांसमोर चाऱ्याचा प्रश्न, भरपाईची मागणी
वार्ताहर /उचगाव
बेकिनकेरे येथील गोजगे मार्गाच्या दुतर्फा असलेल्या पाच गवतगंज्यांना गुऊवार दि. 20 रोजी साडेतीनच्या सुमाराला अचानक लागलेल्या आगीत चारही गवतगंज्या जळून खाक झाल्या. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून चार लाखाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. अग्निशमन दलाच्या जवानांना बोलावून आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र आगीत गवतगंज्या जळून खाक झाल्या. बेकिनकेरे गावाच्या पूर्व दिशेला गोजगे मार्गावर यल्लाप्पा रवळू सावंत, बाळू धाकलू बिर्जे, दिनेश यल्लाप्पा सावंत, इराप्पा आण्णाप्पा सावंत, डीकाप्पा परशराम सावंत या शेतकऱ्यांनी जनावरांसाठी चारा साठवून ठेवला होता. मात्र या आगीत गवंतगज्या जळून त्यांचे नुकसान झाले आहे. भर दुपारी लागलेल्या आगीत गवत गंज्यांनी रौद्ररूप धारण केले. जवळपासच्या नागरिकांनी आग निदर्शनाला येतात अनेकजण घटनास्थळी दाखल झाले.
मात्र आग विझविणे मुश्कील होते. तातडीने अग्निशमन दलाला संपर्क साधण्यात आला. मात्र त्यांना यायला उशीर झाल्याने तोपर्यंत संपूर्ण गवतगंज्या पेटून आगीत खाक झाल्या होत्या. आगीमध्ये गवत पेटत असताना उर्वरित गवत चांगले मिळेल या उद्देशाने जेसीबीच्या साहाय्याने ओडून काढण्याचाही प्रयत्न करण्यात येत होता. मात्र उन्हामुळे आग आटोक्यात आणणे कठीण होते. शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना वर्षभरासाठी लागणारा सुका चारा गवतगंज्याच्या स्वरूपात साठवून ठेवला होता. मात्र आगीत संपूर्ण गवतगंज्या जळून खाक झाल्याने आता जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. तरी शासनाने त्यांना आर्थिक नुकसानीबरोबरच गवतही उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी बेकिनकेरे आणि परिसरातील नागरिकांतून करण्यात येत आहे.









