पुणे : शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सेनेचे माजी नगरसेवक नाना भानगिरे यांच्यासह पाच माजी नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. त्यामुळे सेनेला पुण्यातही धक्का बसण्याची चिन्हे आहेत.
पुण्यात 2017 मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे दहा नगरसेवक निवडून आले होते. त्यामध्ये नाना भानगिरे यांचाही समावेश होता. आता त्यांच्यासह आणखी माजी चार नगरसेवक शिंदे गटात जाणार असल्याचे समजते. तसेच पक्षाचे अन्य काही पदाधिकारीही त्यांच्यासोबत शिंदेंची साथ देऊ शकतात. त्यामुळे ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला धक्का बसणार आहे.
दरम्यान, भानगिरे हे मुंबईत तळ ठोकून आहेत. तेही शिंदे गटात सामील होणार असल्याचे समजते. भानगिरे यांच्यासारख्या नेत्याला फोडून महापालिका निवडणुकांआधी शिंदे हे शिवसेनेला आणखी धक्के देण्याच्या तयारीत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील येत्या काही दिवसात पुण्याचा दौरा करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या दौऱयात सेनेचे काही पदाधिकारीदेखील शिंदे गटात जाण्याची शक्मयता वर्तवण्यात येत आहे.
नाना भानगिरे यांची शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्याचे समजते. भानगिरे यांच्यावर पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी टाकली जाऊ शकते. तसे झाल्यास पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील आणखी काही नेते शिंदे गटात सामील होऊ शकतात. ते शिवसेनेकडून पुणे मनपामध्ये तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.
पुणे महापालिकेत प्रशासन आल्यानंतर निधी अडविल्याची तक्रार करीत भानगिरे यांनी चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे धाव घेतली; त्यानंतर शिंदे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमारांशी बोलून निधी देण्याचा आदेश दिला. भानगिरेंच्या फोनाफोनीने विक्रम कुमारांनीही तब्बल दीडशेपेक्षा अधिक कोटी रुपयांचा निधी दिला. शिंदे आणि भानगिरे यांच्यातील जवळीक दिसून आली. त्यामुळे भानगिरे हे शिंदेंकडे आकर्षित होऊन, त्यांच्या गटात दाखल होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे पुणे महापालिकेत शिवसेनेच्या तिकिटावर तीनवेळा नगरसेवक झालेल्या भानगिरे यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा वाढल्या आहेत.
हडपसर विधानसभा मतदारसंघातून आमदार होण्याची भानगिरेंची इच्छा आहे. ती पूर्ण व्हावी म्हणून विधानसभेच्या 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत त्यांनी नशीब अजमावले. राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकांआधी शिवसेनेच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवल्यानंतर भानगिरे हे मुंबईत शिंदेंच्या मदतीला होते. या संघर्षात शिंदेंनी दिलेली जबाबदारी पार पाडली. त्यानंतर मात्र, शिंदे यांनी बंड केल्यानंतर भानगिरे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत असल्याचे दाखवून दिले. दरम्यान, पुण्यात अहिरांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकांना भानगिरे यांनी हजेरी लावली. मात्र, दुसरीकडे शिंदेंकडेही त्यांचा ओढा असल्याचे लपून राहत नव्हते. त्यामुळे भानगिरेंची भूमिका काय, यावर पुण्याच्या राजकारणात चर्चा सुरू होत्या.
शिंदे गटाचे नेतृत्व भानगिरेंकडे?
शेवटी शिंदेंचे बंड यशस्वी झाले; ते मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीतही बसले. तेव्हाच पुणे शहराच्या विकासाचा मुद्दा पुढे करून भानगिरे यांनी शिंदेंकडे निधीची मागणी केली. त्यानंतरच्या काही मिनिटांतच शिंदेंनी विक्रम कुमारांशी चर्चा केली आणि दीडशे कोटींच्या निधीची घोषणा झाली. त्यावरून शिंदेंच्या आभारासाठी भानगिरे मुंबईत दाखल झाले. तेव्हाच त्यांना आपल्या गोटात ठेवण्यासाठी शिंदेंनी गळ घातल्याचे सांगण्यात आले. त्यावरून भानगिरेंनी अद्याप पत्ता उघड केलेला नाही. मात्र, ते पुढच्या काही दिवसांत या गटात दाखल होऊन पुण्यात शिंदे गटाचे नेतृत्त्व करण्याची शक्यता आहे.








