(भाग 3)
हे आकाश म्हणजे शिवतत्व जे आहे ते जाणवतं पण प्रत्यक्ष अनुभवता येत नाही. म्हणजे ग्रह आणि तारे आम्हाला दिसतात पण आम्हाला हात लावता येत नाही. म्हणून ते आम्ही कल्पनेमध्ये साकारतो. अशी प्रत्यक्ष अनुभूती येण्यासाठी ध्यान धारणेतून आकाश तत्व लवकर अनुभवता येतं. योग क्रियेतून समाधी अवस्था मिळवता यायला हवी. या ग्रहताऱ्यातून उष्ण थंड गुरुत्वीय तत्व वर निर्माण होत असतं. या सगळ्यांची निर्मिती करणारं आकाश तत्व ब्रम्हांड खूप प्रचंड आहे. ज्याला आम्ही अनेक आकाशगंगा असं संबोधतो. निळा रंग प्राण्यांना येतो आणि झाडांवर मात्र हिरवा दिसायला लागतो. निळ्याचीच गडद छाया सर्वत्र असते. आकाशाचे निळेपण पाण्यात की पाण्याचे निळेपण आकाशावर, असा प्रश्न आम्हाला पडतो. या निळ्या आकाशावर जेव्हा अग्नीचे तेज पिवळ्या केशरी रंगात उमटतं तेव्हा अग्नीची प्रखरता आम्हाला जाणवते. या निळेपणातच पाण्यामध्ये अग्नीतत्व लपून बसलेलं असतं. या सगळ्यांना जड रुपात धारण करणारी पृथ्वी निळाईने नटलेली असते. कारण आकाश सर्वव्यापी आहे. त्याला मर्यादाच नाहीत. म्हणजे आकाश हे विश्वरूप आहे. जे दिसतं पण जाणवत नाही किंवा हातात घेता येत नाही, अशा निळेपणाची खाण ज्ञानदेवांना सापडते. सर्वत्र तोच भरून राहिला आहे, याची जाणीव झाली म्हणूनच रेड्याच्या मुखातून वेद प्रकटले. जड भिंतीतले अणुरेणू वायुरूप होऊन चालायला लागले. ही भक्तीची अवस्था मोगऱ्यासारखी, वेलीसारखी आकाशापर्यंत पोहोचते, त्यावेळेला भक्तीचा असा काही बहर येतो, की जेवढे आम्ही फुले वेचत जातो तेवढी फुलं दुपटीने पुन्हा पुन्हा भरत जातात. असं ज्ञान होणारे, ज्ञान देणारे शब्द ज्ञानदेव सांगतात. असं ज्ञान आकाशतत्वातून गौतम बुद्धांना पौर्णिमेच्या रात्री तर गुरुगोविंद सिंहांना पाण्यात ध्यानधारणा करताना उभे असताना झालं. मोहम्मद पैगंबर याला वाळवंटातल्या निरभ्र आकाशातून ऐकू आलं. येशूच्या जन्म ठिकाण दिशा दाखवणारे तारे आकाशातच प्रकटले. असं हे आकाश प्रत्येक आत्म्याचा वाहक असते. त्याचं एक फार सुंदर वर्णन एका कवींनी केले आहे…………..तो असतो आपल्या पुढती गंतव्य दावण्यासाठी……..तो असतो पाठीमागे……..उगवती उमगण्यासाठी……. नसतात दिशा ठरलेल्या…..तो नेतो त्या वाटेला………त्यामागे जावे लागे………..श्रद्धेय ठरवूनी त्याला……..तो नेतो पैशांठाई………..नसतेच तिथे ना कोणी…….जगण्याच्या साऱ्या वाटा…..होतात जिथे अनवाणी……तो कोण कळेना काही….तोलतो अधांतर……..आपुले………आधार तयांना कसला……तो रचितो सारे इमले………आरंभीअंती यापुल्या……..जो सदैव सोबत असतो….. जो सर्व व्यापूनी उरतो……तो केवळ ईश्वर असतो…….








