श्वानदंशाच्या वाढत्या घटना चिंताजनक : सरकारी खात्यांचे एकमेकांकडे बोट : खबरदारी घेण्याची आवश्यकता
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यात 10 हजार 551 जणांना श्वानदंश झाला असून, यापैकी पाचजणांचा मृत्यू झाला आहे. राज्य सरकारच्या आरोग्य खात्याचे कार्यदर्शी हर्ष गुप्ता यांनी बेळगावात रेबिजमुळे पाचजणांचा मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट केले आहे. सहा महिन्यात श्वानदंश झालेल्या पाचजणांचा मृत्यू झाला आहे हे खरे असले तरी संबंधितांचा शवचिकित्सा अहवाल येणे बाकी आहे. त्यामुळे रेबिजमुळे त्यांचा मृत्यू झाला आहे असे सांगता येणार नाही, असे स्पष्टीकरण जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. एस. दोडमनी यांनी दिले आहे. राज्यात श्वानदंश होण्याची घटना दिवसेंदिवस वाढत चालली आहे. 1 जानेवारी ते 30 जून या सहा महिन्याच्या काळात 2.3 लाख जणांना श्वानदंश झाला आहे. तर 19 जणांचा रेबिजमुळे मृत्यू झाल्याचा अहवाल आरोग्य खात्याने जाहीर केला आहे. यंदा सहा महिन्यात 2 लाख 31 हजार 91 जणांना श्वानदंश झाल्याची नोंद झाली आहे. गतवर्षी याचकाळात 1 लाख 69 हजार 672 जणांचा कुत्रांनी चावा घेतला होता तर 18 जणांचा रेबिजमुळे मृत्यू झाला होता.
सर्वाधिक विजापुरात चावा घेतल्याच्या घटना
2024 मध्ये वर्षभरात राज्यात 3.6 लाख जणांना दंश तर 42 जणांचा रेबिजमुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. 2024 सालातील पहिल्या सहा महिन्याच्या तुलनेत यंदा नागरिकांना श्वानदंश होण्याच्या घटनांत 36.20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कर्नाटक सरकारने 2022 मध्ये कुत्र्यांच्या चाव्याच्या घटनांचा समावेश अधिसुचित आजारांच्या यादीत केला होता. त्यानंतर सर्व सरकारी आणि खासगी आरोग्य संस्था कुत्र्यांच्या चाव्याची आणि रेबिजची निदान झालेल्या प्रकरणांची नोंद करून आरोग्य विभागाला माहिती देत आहेत. 2022 नंतर यावर्षी राज्यात कुत्र्यांच्या चाव्याच्या सर्वाधिक घटना घडल्याची नोंद झाली आहे. राज्यात सर्वाधिक विजापूर जिल्ह्यात कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्याची नोंद झाली आहे.
कुत्रा चावल्यास तातडीने उपचार घ्या
कुत्र्याने चावा घेतल्यानंतर नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष करू नये. तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेणे जरूरीचे आहे. पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतल्यानंतर दुर्लक्ष केल्यास जीवावर बेतू शकते. रेबिज होऊ नये यासाठी औषधोपचार घेतल्यानंतर प्रतिबंध करता येऊ शकते. मात्र एकदा रेबिजची लागण झाल्यास मृत्यू अटळ आहे. त्यामुळे कोणीही हयगय न करता तातडीने औषधोपचार घ्यावेत, असे आवाहन आरोग्य खात्याकडून केले जात असले तरी अद्यापही बहुतांशजण याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर मृत्यू ओढवत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
रेबिजविषयीची जनजागृती तीव्र करण्याची गरज
दरवर्षी रेबिज संदर्भात सरकारकडून जनजागृती केली जाते. तरीदेखील नागरिकांमध्ये म्हणावी तशी रेबिजविषयी जागृती झाली नसल्याचे दिसून येत आहे. वर्षभरात बेंगळूर शहर आणि जिल्ह्dयात सर्वाधिक 19 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सहा महिन्यात 9 जणांवर मृत्यू ओढावला आहे. या पाठोपाठ बेळगाव जिल्ह्dयात पाच, बागलकोट, बळ्ळारी, चिक्कबळ्ळापूर आणि शिमोगा जिल्ह्dयात प्रत्येकी एक प्रकरणाची नोंद झाली आहे.









