महावितरणचे कर्मचारी व ग्रामपंचायत सदस्यांकडून धाडशी कामगिरी
कसबा बीड /वार्ताहर
कसबा बीड परिसरातील महे, आरे, गाडेगोडवाडी, सावरवाडी, कसबा बीड, गणेशवाडी, सावरवाडी आदी गावात मुसळधार पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे गेली चार ते पाच दिवस विद्युत पुरवठा खंडित झाला होता. पण महे गावच्या ग्रामपंचायत सदस्य आणि महावितरणच कंपनीच्या विद्युत कर्मचाऱ्यांनी धाडसाने हा पुरवठा सुरळीत केला.
जोरदार पाऊस व पुराचे वाढते पाणी यामधून महावितरणचे कर्मचारी कृष्णात चव्हाण, योगेश पाटील, महे गावचे माजी उपसरपंच निवास पाटील, सुजित व रितेश मडावी यांनी शर्थीचे प्रयत्न करून आज वाहत्या पाण्यात पोहत जाऊन तुटलेल्या तारा, 11 केव्ही तुटलेला जंप व इतर दुरुस्तीचे काम केले. हे काम करताना दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती, पण भागातीत नागरिकांना गेली तीन दिवस लाईट नसल्याने येणाऱ्या अडचणीं यामुळे त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावले आहे. वरून पडणारा पाऊस, पोहत व ताटकळत उभे राहून झाडाझुडपातून खांबावर चढून तुटलेला जंप जोडण्यात आला. गेली चार पाच दिवसांची नागरिकांची झालेली गैरसोय त्यांनी दूर केली. त्यांच्या या कार्याचे कसबा बीड परिसरातील सर्व गावातून कौतुक होत आहे.








