पुणे : कारागृहातील लिपीक, तांत्रिक, शिक्षक, कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा या निर्णययाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या आदेशाने देण्यात आले.
महाराष्ट्र शासनाने राज्यातील अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व विभागांना फेब्रुवारी 2020 पासून 5 दिवसांचा आठवडा लागू केला. त्यानुसार महाराष्ट्र कारागृह विभागातील लिपीक, तांत्रिक, शिक्षक कर्मचारी शनिवारी व रविवारी कर्तव्यावर येत नव्हते. त्यामुळे त्यांच्या पगारात कपात होत होती. ठाणे मध्यवर्ती कारागृह व तळोजा मध्यवर्ती कारागृहाचे अधिक्षक शासन निर्णयाचा अवमान करुन लिपिक, तांत्रिक~ शिक्षक कर्मचारी यांची शनिवारी गैरहजेरी लावून वेतन कपात करित होते.
याबाबत ठाणे व तळोजा कारागृह अधीक्षक यांच्याविरुद्ध लिपीक, तांत्रिक, शिक्षक संघटनेकडे तक्रारी प्राप्त झाल्याने संघटनेने पाठपुरावा करून ठाणे व तळोजा कारागृहातील अधिक्षकांमार्फत अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्याकडे निवेदन दिले होते. यावर सर्व कागदपत्रांची पडताळणी करून लिपीक, तांत्रिक शिक्षक कर्मचारी यांची कारागृह पोलिसांप्रमाणे कर्तव्य नसून इतर कार्यालयातील लिपीक, तांत्रिक शिक्षक कर्मचारी प्रमाणेच सेवा असल्याची खात्री करण्यात आली. त्यानुसार कारागृह विभागातील लिपीक, तांत्रिक, शिक्षक कर्मचारी यांनाही शासन निर्णयनुसार पाच दिवसांचा आठवडा लागू असल्याचे पत्र काढत त्याची अंमलबजावणीचे निर्देश देण्यात आले.








