पुणे / वार्ताहर :
सोलापूर येथील सहकारी सूतगिरण्या लिलावात घेतल्यानंतर संबंधित सूतगिरण्या आणि सूतगिरण्यांची जमीन एका व्यवसायिकाला विक्री करण्याच्या बहाण्याने 5 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपींवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली आहे.
मे. आयबीए एंटरप्राईजेसचे संचालक अब्दुल करीम झाका (रा. आगरी पाडा, मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत प्रशांत ओम प्रकाश भंडारी (वय 47, रा. कॅम्प, पुणे) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. जानेवारी 2006 ते मे 2023 यादरम्यान हा प्रकार घडलेला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मे. आयबी इंटरप्राईजेसचे संचालक अब्दुल करीम झाका यांनी सोलापूर येथील लिलावातील सहकारी सूतगिरणी लिमिटेड व यशवंत सहकारी सूतगिरणी तक्रारदार प्रशांत भंडारी यांना विक्री करत असल्याचे आमिष दाखवले. सूतगिरणीची जमीन तक्रारदार भंडारी यांच्या नावे करण्याचे खोटे आश्वासन देऊन त्यांच्याकडून पाच कोटी रुपये घेतले. मात्र, या सूतगिरण्यांचे खरेदीखत प्रशांत भंडारी यांच्या कंपनीशिवाय दुसऱया कंपनीच्या नावे करून घेतलेले पैसे परत न देता तक्रारदारांची फसवणूक करण्यात आली याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस धनवडे पुढील तपास करत आहे.