ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मालाडमधील मार्वे समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेलेली 5 मुलं बुडाल्याची घटना आज सकाळी घडली. बुडालेल्या दोन मुलांना वाचविण्यात यश आले आहे. तिघेजण बेपत्ता असून, त्यांचा शोध सुरू आहे.
अंकुश भारत शिवरे (13 वर्ष) आणि कृष्णा जितेंद्र हरिजन (16) या दोघांना वाचविण्यात यश आले आहे. तर निखिल साजिद कायमकूर (12), अजय जितेंद्र हरिजन (12) शुभम राजकुमार जयस्वाल (12) हे तिघेजण बेपत्ता आहेत.
समुद्रात बुडालेली सर्व मुले मालवणी परिसरातील आहेत. आज सकाळी मार्वे समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारण्यासाठी ती आली होती. त्यानंतर समुद्रात आंघोळ करण्यासाठी ती उतरली. समुद्रकिनाऱ्यापासून साधारणपणे अर्धा किलोमीटर आत गेल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने मुले बुडाली. त्यामधील अंकुश आणि कृष्णाला वाचविण्यात यश आले आहे. तर निखिल, अजय आणि शुभम हे तिघेजण बेपत्ता असून, अग्निशमन दल, महापालिकेचे जीव रक्षक आणि कोस्टगार्डचे जवान त्या तिघांचा शोध घेत आहेत.








